मुंबई | Mumbai
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात अभिजीत दिपके यांच्यासह अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास, आफरीन नवाज, सोम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे यांच्यासह अन्य आंदोलकांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP च्या वतीने शिवाजी पार्क मैदानात २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, शिवाजी पार्क परिसर हा शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) आणि रहिवासी भाग असल्याने मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. असे असतानाही पोलिसांचे आदेश झुगारून शेकडो आंदोलक मैदानाबाहेर जमा झाले होते.
अमरावतीच्या कुमकुम मोहोदचा ‘गोल्डन ॲरो’! वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताला पहिले सुवर्ण
५०० आंदोलकांवर गुन्हा
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सुमारे ५०० आंदोलकांचा समावेश असल्याची माहिती आहे. परवानगी नसताना जमाव जमवणे, सभा घेणे आणि घोषणाबाजी करणे, तसेच सार्वजनिक रस्त्यावर ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.




