अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (अहमदनगर डीसीसी बँक) निवडणुकीसाठी अद्याप अधिकृत प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. या राजकीय घडामोडींमुळे आतापासूनच निवडणुकीत रंगत येऊ लागली असून, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
ज्येष्ठ नेते गडाख यांच्या तब्येतीची सभापती शिंदेंकडून विचारपूस
राजकीय आणि सामाजिक अनुभवाची शिदोरी घेतली जाणून
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ज्येष्ठनेते तथा माजी खासदार यशवंतराव गडाख यांची गुरुवारी नगर येथील निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान सभापती शिंदे यांनी गडाख यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव जाणून घेतला. दरम्यान, आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे-गडाख यांच्यात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय-सामाजिक नेतृत्व आणि साहित्य चळवळीतील अग्रगण्य नाव असलेल्या माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानी गुरुवारी हा भेटप्रसंग घडला. साधारण अर्धा तास चाललेल्या या बैठकीत कौटुंबिक जिव्हाळ्याच्या गप्पागोष्टींसोबतच जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी यशवंतराव गडाख यांनी आपल्या राजकीय प्रवासातील विविध अनुभव आणि सहकार क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला. तर सभापती शिंदे यांनी अत्यंत उत्सुकतेने गडाख यांच्याकडून राजकीय व सामाजिक समन्वयाची शिदोरी जाणून घेतली.
दरम्यान, भेटीनंतर सभापती शिंदे यांनी या भेटीबाबत कोणीही चुकीचा राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन प्रत्येकाला मिळाले पाहिजे. याच हेतूने गडाख साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या अनुभवाचे पाठबळ जाणून घेण्याचे नियोजन केले होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राम शिंदे यांच्या भूमिकेला सहकार्य करावे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे भानुदास मुरकुटे यांची मागणी
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजासह आगामी निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन लक्ष घालावे. तसेच, या संदर्भात सभापती शिंदे जो निर्णय किंवा भूमिका घेतील, त्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पूर्ण सहकार्य करावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठनेते तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.
गुरुवारी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी सभापती शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुरकुटे म्हणाले, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी बँकेच्या कामकाजात लक्ष घालावे, अशी विनंती आम्ही केली असून, त्यांनी आमच्या मागणीनुसार योग्य भूमिका घेण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, बीड दौर्यावर जाताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काही काळासाठी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर थांबल्या होत्या.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, भानुदास मुरकुटे आणि पांडुरंग अभंग यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सभापती शिंदे जे निर्णय घेतील, त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी पाठबळ व सहकार्य द्यावे, अशी मागणी करण्यात आल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. या प्रसंगी नीरज मुरकुटे आणि बबन मुठे यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्धा तास बंद दाराआड चर्चा
गुरुवारी विश्रामगृहावर सभापती शिंदे, मुरकुटे आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड खलबते झाली. या चर्चेदरम्यान मुरकुटे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील विरोधकांची भक्कम मोट बांधण्याची सूचना शिंदे यांना केली. या घडामोडींमुळे येत्या काळात अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप आणि फेरबदल होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
बिनविरोध की निवडणूक हे आताच सांगता येणं कठीण
सहकारात चांगले घडावे, यासाठी भेटीगाठी आवश्यक – राम शिंदे
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, सहकारात चांगले घडावे, यासाठी भेटीगाठी आवश्यक आहेत. काहीजणांनी आपल्याला जिल्हा बँकेसाठी पुढाकार घेण्यास सांगितले आहे. सध्या जिल्हा बँकेच्या ठरावांची छाननी सुरू आहे. प्रारूप यादी होऊन अंतिम मतदार यादी तयार होण्यास अद्याप वेळ आहे. यामुळे सध्या तरी बँकेची निवडणूक बिनविरोध होईल की पॅनल उभे राहतील हे आज तरी सांगणे कठीण असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची वेध सध्या लागले आहेत. येत्या काही दिवसात बँकेच्या मतदारांची प्रारूप यादी जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सभापती शिंदे यांनी जिल्ह्यातील सहकारातील मातब्बर नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
बँकेचे माजी अध्यक्ष, माजी खासदारंच्या यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली तर नगरच्या सरकारी विश्रामगृहावर माजी आमदार बँकेचे माजी संचालक भानुदास मुरकुटे व पांडुरंग अभंग यांचीही बंद खोलीत भेट घेतली. त्यानंतर बोलताना राम शिंदे म्हणाले, आपण सभापती असलो तरी सहकारातील ज्येष्ठांचा मार्गदर्शन, अनुभव यासाठी या नियोजित भेटी होत्या. जिल्हा बँकेच्या ठरावांची छाननी सध्या सुरू आहे. प्रारूप यादी होऊन अंतिम मतदार यादी तयार होण्यास अद्याप वेळ आहे. त्यामुळे सध्या तरी बँकेची निवडणूक बिनविरोध होईल की पॅनल उभे राहतील हे आज तरी सांगणे योग्य नाही.
प्रसंगानुरूप विखे आणि मी भेटत असतो
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना टाळून भेटीगाठी होत आहेत याकडे लक्ष वेधले असता सभापती शिंदे म्हणाले त्यांच्या नजरेतून पाहिले तर ते गैर वाटत असेल, परंतु सहकारात, जिल्हा बँकेमध्ये चांगले होण्यासाठी भेटीगाठी आवश्यक आहेत. विखे आणि मी एकाच पक्षाचे आहोत प्रसंगानुरूप आम्ही दोघे भेटत असतो.
उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक
नगरहून बीडला जातांना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर काही काळ थांबलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे गुरूवारी दुपारी सभापती राम शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी काही काळ उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते मुरकुटे बाणि अंभग यांनी सभापती शिंदेच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.




