Wednesday, September 9, 2026
Homeनगरजिल्हा बँक निवडणूक : सभापती शिंदेंची जोरदार मोर्चेबांधणी; आज संगमनेर आणि उद्या...

जिल्हा बँक निवडणूक : सभापती शिंदेंची जोरदार मोर्चेबांधणी; आज संगमनेर आणि उद्या शिर्डी आणि राहुरीत भेटी ‘गाठी’

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आतापासूनच निवडणुकीसाठी कमालीचे सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. कर्जत-जामखेड तालुक्यातून पूर्ण ताकदीनिशी ‘ठरावा’च्या माध्यमातून मैदानात उतरलेल्या सभापती शिंदेंनी आता पक्षीय जोडे बाजूला ठेवून जिल्ह्यातील समविचारी नेत्यांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सर्वपक्षीय राजकीय गाठीभेटींमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील वातावरण तापसण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सभापती शिंदे आज शनिवारी सांयकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गटाचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनार यांच्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. शिंदेंच्या या संगमनेर दौऱ्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा ज्वर चढणार आहे. या भेटीनंतर शिंदे सायंकाळी शिर्डीत मुक्कामी जाणार असून, तिथे भाजपचे आ. विवेक कोल्हे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण खलबतं करणार असल्याचे समजते. शनिवार सायंकाळपासून ते रविवार सकाळपर्यंत शिंदे शिर्डीत तळ ठोकून असणार असून, या काळात ते आणखी कोणाकोणाच्या भेटी घेतात, याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

थोरातांच्या आधी शिंदेंची फिल्डिंग’ ?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदारांचे ठराव घेण्याची मुदत दोन दिवसांपूर्वीच संपली असून, आता प्रशासकीय छाननीला सुरुवात झाली आहे. बँकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय मोट बांधण्यात काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यशस्वी झाले होते. त्यावेळी थोरातांच्या खांद्याला खांदा लावून विवेक कोल्हे यांनी निवडणुकीचे संपूर्ण नियोजन केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत थोरात सक्रिय होण्यापूर्वीच भाजपचे नेते आणि सभापती राम शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

उद्या तनपुरे यांच्या वाड्यावर!

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासोबत राहुरी येथील शहरातील तनपुरे वाड्यावर होणारी सभापती शिंदे यांची सदिच्छा भेटही राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिंदेंनी पाथर्डीच्या भाजप आ. मोनिकाताई राजळे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे राम शिंदे यांनी जिल्हा बँकेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी सुरू केलेल्या या गाठीभेटींच्या सत्राला सहकार क्षेत्रात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : आरोग्य व्यवस्थेवरील हल्ले

0
डॉक्टर हा देवाचे रूप असतो’ अशी श्रद्धा समाजात पिढ्यान्पिढ्या रुजलेली आहे. आपल्या प्राणांचे रक्षण करणार्‍या, अहोरात्र रुग्णांच्या सेवेत झटणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक...