अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेला जागतिक शौचालय दिनानिमित्त (19 नोव्हेंबर) जलशक्ती मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभागाने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत विशेष अभियान जाहीर केले आहे. या अभियानाचे नाव ‘स्वच्छ शौचालय- गरिमामय भविष्य’ असे असून, यंदाची जागतिक संकल्पना ‘सुरक्षित शौचालये, समान भविष्य’ अशी आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ही माहिती दिली.
अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये आहेत, पण ती वापरात नाहीत, नादुरूस्त आहेत, त्यात पाणी नाही, दरवाजा नाही, किंवा महिलांसाठी व दिव्यांगांसाठी सुरक्षित नाहीत. तसेच शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणची शौचालये वापरण्यायोग्य नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि शौचालय ही केवळ सुविधा नसून ती मानवी प्रतिष्ठा, आरोग्य आणि समानतेचा प्रश्न आहे, हा संदेश देण्यासाठी हे अभियान आहे. हे अभियान थेट शाश्वत विकास ध्येय- म्हणजेच सर्वांसाठी स्वच्छता या उद्दिष्टाशी जोडलेले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम पाणी व स्वच्छता समितीची विशेष बैठक घेऊन अभियानाचा शुभारंभ होईल.
या बैठकीस सरपंच, ग्रामसेवक, बचत गटाच्या महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि माय भारतचे स्वयंसेवक उपस्थित राहतील. गावातील शौचालयांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक गावात स्वच्छ भारत मिशन- ग्रामीणच्या कर्मचार्यांकडून सर्व सामुदायिक शौचालय संकुल आणि संस्थात्मक शौचालये (शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय) यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यासाठी दोन तपासण्या केल्या जाणार आहे. या अभियानाची सर्व माहिती, फोटो, व्हिडिओ आणि दुरूस्ती केलेल्या शौचालयांची माहिती पोर्टलवर दररोज अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीत नादुरूस्त आढळलेली सर्व शौचालये तात्काळ दुरूस्त करण्यात येणार आहेत. त्यांची रंगरंगोटी, स्वच्छता केली जाणार आहे.
शौचालय ही केवळ बांधकामाची गोष्ट नाही, ती महिलांच्या सुरक्षेची, मुलींच्या शिक्षणाची आणि मानवी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. जिल्ह्यातील एकही शौचालय नादुरूस्त राहणार नाही, याची दक्षता सर्व ग्रामसेवकांनी घ्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी दिल्या आहेत. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले शौचालय स्वच्छ, सुगंधी आणि वापरण्यायोग्य ठेवावे, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले आहे.
उत्कृष्ट शौचालय ठेवणार्यांचा सत्कार
लोकांमध्ये शौचालय स्वच्छ ठेवण्याची स्पर्धा लागावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील 2 उत्कृष्ट, स्वच्छ, सुंदर सजवलेली वैयक्तिक शौचालये निवडून पंचायत समितीकडे पाठवायची आहेत. पंचायत समिती स्तरावरून 3 उत्कृष्ट शौचालये जिल्ह्याकडे पाठविली जातील. 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनी जिल्हास्तरावर या कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सार्वजनिक शौचालयाचाही गौरव होणार आहे.




