संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द, रहिमपूर, साकूर, खांडगाव आणि निमज येथे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत प्रवरा नदीपात्रातून सुमारे 400 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाल्याचे उघडकीस आले. तसेच विविध ठिकाणांहून एकूण 300 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 12 वाहने ताब्यात घेण्यात आली असून, 52 जणांविरोधात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांच्या कालावधीत काही अधिकारी आणि कर्मचारी रजेवर असल्याचा गैरफायदा घेत वाळूतस्करांनी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाळूतस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकार्यांनीही अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांची स्वतंत्र पथके तयार करून कारवाईची मोहीम हाती घेतली. या मोहिमेची सुरुवात संगमनेर खुर्द येथील गंगामाई घाट परिसरातून करण्यात आली. येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेला सुमारे 180 ब्रास वाळूसाठा महसूल पथकाने जप्त केला.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर वाळूची वाहतूक करणारा एक पिकअप आढळून आला. महसूल पथकाने तो थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केला आणि वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारानंतर महसूल पथकाने परिसरातील शोधमोहीम अधिक तीव्र केली. दरम्यान, रहिमपूर येथील ओझर बंधार्याजवळ प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. घटनास्थळाची पाहणी केली असता नदीपात्रातून अंदाजे 400 ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाल्याचे आढळले. याठिकाणी वाळूने भरलेली तीन वाहने आणि एक ट्रॅक्टर आढळून आले. महसूल पथकाने ही वाहने ताब्यात घेतली.
साकूर येथेही अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. त्यानंतर खांडगाव शिवारात नदीपात्रातून उत्खनन करून साठवलेला 100 ब्रास वाळूसाठा, तर निमज शिवारातून 20 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. या संपूर्ण मोहिमेत संगमनेर शहर, संगमनेर तालुका, आश्वी आणि घारगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 52 जणांविरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन, साठवणूक आणि वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाहन पळविले तरी कारवाईतून सुटका नाही
वाळूतस्करांनी कारवाईदरम्या वाहने पळवून नेली म्हणून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांकडे डोळेझाक केली जाणार नाही. त्यांनी केलेले अवैध उत्खनन आणि साठवणुकीचे पंचनामे करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. संबंधितांच्या सातबारा उतार्यावर दंडाचा बोजा नोंदविण्यासह महाराष्ट्र शासनाचे नाव चढविण्यात येईल. याशिवाय, शासकीय कामकाजात अडथळा आणून वाहनासह पळून जाणार्यांविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– धीरज मांजरे, तहसीलदार




