अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नियमांचे पालन न करणार्या जिल्ह्यातील 42 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, दूध डेअरी आणि किराणा दुकानांसह विविध आस्थापनांची तपासणी करून अस्वच्छता, पेस्ट कंट्रोल न करणे, कामगारांच्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणे आणि स्वच्छ पाण्याचा वापर न करणे, अशा गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात अन्न व्यवसायातील नियमभंगाविरोधात कारवाईला वेग आला. त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातही तपासणी मोहीम राबविण्यात आली. तीन सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकार्यांकडून जिल्ह्यातील हॉटेल, कॅन्टीन, दूध डेअरी, किराणा दुकाने आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्नपदार्थ तयार करण्याची जागा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नपदार्थांची साठवणूक, कीटक नियंत्रण आणि कामगारांच्या आरोग्यविषयक बाबींची पाहणी करण्यात आली.
तपासणीच्या पहिल्या टप्प्यात नियमांचे उल्लंघन किंवा त्रुटी आढळलेल्या आस्थापनांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी ठरावींक मुदत दिली जाते. त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाते. दुसर्या तपासणीतही आवश्यक सुधारणा झाल्या नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई सहायक आयुक्तांकडून करण्यात येते. काही ठिकाणी नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने कोणतीही प्रतीक्षा न करता तातडीने परवाना निलंबित करण्यात आल्याची उदाहरणेही आहेत.
तपासणीदरम्यान अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या मूलभूत नियमांचेही पालन होत नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी भिंतींना रंग नसणे, फरशा तुटलेल्या अवस्थेत असणे, परिसराची योग्य स्वच्छता न राखणे, तसेच फळे आणि भाजीपाला सडलेल्या अवस्थेत साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. वेळेवर पेस्ट कंट्रोल केले जात नसल्यामुळे काही ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भावही आढळला. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत काम करणार्या कर्मचार्यांच्या आरोग्य तपासणीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी न करता त्यांच्याकडून अन्नपदार्थ तयार करून घेतले जात होते.
एखाद्या कामगाराला संसर्गजन्य आजार असल्यास त्याच्या संपर्कातून अन्नपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि आवश्यक तपासण्या करणे बंधनकारक आहे. याशिवाय अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर न करणे, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक न करणे आणि परिसरात स्वच्छतेचे निकष न पाळणे, अशा त्रुटीही तपासणीत आढळल्या. या सर्व बाबींचा विचार करून संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.




