अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात कोणतीही पाणी कपात करू नका, अशी एकमुखी मागणी सत्ताधारी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी (18 नोव्हेंबर) मनपात झालेल्या पाणी कपात उपाययोजना सभेत महापौर ज्योती गाडे व मनपा प्रशासनास केली. शहरातील पाणीप्रश्नावर महापौर गाडे यांनी बुधवारी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती.
दरम्यान, या बैठकीत शहराच्या हक्काचे पाणी नागरिकांना मिळावे, अनधिकृत नळ कनेक्शन शोधून अधिकृत करावेत, पाणी वितरणातील असमतोल दूर करावा, गळती रोखावी तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशा विविध मागण्या नगरसेवकांनी केल्या. बैठकीदरम्यान, नगरसेवक निखिल वारे शहरात सुमारे दीड लाख मालमत्ता असून नळ कनेक्शनची संख्या सुमारे 70 हजार असल्याची माहिती देत या तफावतीकडे लक्ष वेधले. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढावेत. अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी नागरिकांना संधी द्यावी; मात्र त्यानंतरही कनेक्शन अधिकृत न केल्यास संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक अविनाश घुले यांनी शहरातील पाणी वितरणातील असमतोल दूर करण्याची मागणी केली. काही भागात दररोज पाणीपुरवठा होतो, तर काही भागात दोन ते तीन दिवसांनी आणि काही ठिकाणी आठ दिवसांनी पाणी मिळते. हा असमतोल दूर करून पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक तयार करावे आणि नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले. पाणी बचत आणि गळती रोखण्यासाठी नळांना तोट्या बसवाव्यात. दुष्काळाच्या परिस्थितीकडे संकट म्हणून न पाहता संधी मानून शासनाकडून पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष निधी मिळविण्याचा प्रयत्न करावा. पाणीटंचाईसंदर्भातील प्रस्ताव तयार करावेत, नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करावी. आगामी काही महिन्यांत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व वाढणार असून नागरिक किंवा नगरसेवकांनी पाइपलाइन गळतीची तक्रार केल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घ्यावे. शहरातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी दुष्काळी आराखडा तयार करावा, असे घुले यांनी सांगितले.
महापौर गाडे यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले असून महापालिकेच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर योग्य नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, शहरातील पाणी नियोजनाचा आराखडा तयार करून त्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. पाणीप्रश्नावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पाण्यासाठी आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी दिले जाणार असल्याचे नगरसेवक संपत बारस्कर यांनी सांगितले. अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अभय योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी दिली.
500 कोटींचा पाणीपुरवठा डीपीआर
पाणीपुरवठा अधिकारी गणेश गाडळकर यांनी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असे सांगितले. पुढील 30 वर्षांचा विचार करून महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा सुमारे 500 कोटी रूपयांचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या योजनेमध्ये मुळा धरणातून नवीन पाइपलाइन टाकणे, शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारणे आणि नवीन दहा पाण्याच्या टाक्या उभारणे प्रस्तावित आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नळ कनेक्शनसाठी अभय योजना
आयुक्त यशवंत डांगे यांनी अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अभय योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेव्दारे नागरिकांना अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्याची संधी दिली जाईल. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, गळती नियंत्रण, पाणी बचत, अनधिकृत कनेक्शनवर कारवाई आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.




