संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना, या निवडणुकीच्या हालचालींचे केंद्रस्थान संगमनेर ठरत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहिल्याने संगमनेरचे सहकार क्षेत्रातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेत समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्यावर सोपविण्यात आल्याचेही वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या राजकारणात संगमनेरचे स्थान आणि माजी मंत्री थोरात यांची भूमिका याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संगमनेर तालुक्याला गतवेळी दोन प्रतिनिधित्वाच्या संधी मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेरच्या वाट्याला किती जागा येतात आणि त्या जागांवर कोणाला संधी मिळते, हा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. गतकाळात तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहर्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विद्यमान समीकरणांमध्ये बदल होणार का, नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील 715 मतदार या दोन जागांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध गटांचा समतोल, संस्थांचे प्रतिनिधित्व आणि मतदारांचे समीकरण यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे आणि सहकार क्षेत्रातील नेते उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या जागावाटपाची चर्चा आता तालुकानिहाय पातळीवर निर्णायक टप्प्यात जाण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्याच्या वाट्याला किती जागा येणार, त्या जागांवर कोणती नावे पुढे येणार आणि माजी मंत्री थोरात कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठांच्या अनुभवाला प्राधान्य मिळते की नव्या चेहर्यांना सहकाराच्या राजकारणात प्रवेश दिला जातो, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. एकूणच जिल्ह्यातील राजकारणात माजी मंत्री थोरातांचा दबदबा यातून अधोरेखित होत आहे.
कोणाला मिळणार उपाध्यक्ष पद?…
यापूर्वी संगमनेरातून जिल्हा बँकेचे अध्यक्षपद तब्बल अठरा वर्षे स्व. भाऊसाहेब थोरात यांनी भूषवले. त्यानंतर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांना ही संधी मिळाली. याशिवाय उपाध्यक्ष पदावर रामदास वाघ, अॅड. माधवराव कानवडे यांना संधी मिळाली. आताच्या कारभारात नेमकी कोणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.




