अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 1 हजार 471 शेतकर्यांचा समावेश झाला आहे. तसेच इतर बँकांच्या 2 हजार 944 शेतकर्यांचाही या यादीत समावेश असून, तिसर्या यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 4 हजार 415 शेतकर्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
दरम्यान, या योजनेच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये 1 लाख 42 हजार 441 शेतकर्यांचा समावेश झाला होता. आता तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर आजपर्यंत एकूण 1 लाख 46 हजार 856 शेतकर्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची यादी उपलब्ध झाली आहे. त्यापैकी 1 लाख 33 हजार 505 शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, असेही सुरवसे यांनी सांगितले. ज्या पात्र शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवर लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित पात्र शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या शेतकर्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा. याशिवाय, मयत खातेदारांच्या खात्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी संबंधित विकास संस्थेकडे किंवा बँकेकडे वारसाची नोंद करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.




