Monday, November 23, 2026
Homeक्राईमCrime Diary : पाच हजारांच्या आमिषापायी बँक खाते सायबर गुन्हेगारांच्या हवाली!

Crime Diary : पाच हजारांच्या आमिषापायी बँक खाते सायबर गुन्हेगारांच्या हवाली!

देशभरातील सायबर फसवणुकीचे पैसे फिरविण्यासाठी अहिल्यानगरचा वापर

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून लुटलेली कोट्यवधी रूपयांची रक्कम फिरविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बँक खात्यांचा वापर केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ पाच ते दहा हजार रूपयांच्या कमिशनच्या आमिषापोटी देखील काही नागरिकांनी आपली चालू खाती गुन्हेगारांच्या हवाली केल्याचे येथील सायबर पोलिसांच्या तपासातून उघडकीस आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक बँक खात्यांचा वापर देशभरातील विविध सायबर फसवणूक प्रकरणांतील पैसे स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळविण्यासाठी करण्यात आला. अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या तपासात जिल्ह्यातील अनेक म्युल खातेधारकांची माहिती समोर आली असून, राज्यासह देशातील विविध सायबर पोलीस यंत्रणांच्या तपासातही जिल्ह्याचे कनेक्शन उघड झाले आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर शहरासह संगमनेर, शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक बँक खात्यांमध्ये देशाच्या विविध भागांत झालेल्या सायबर फसवणुकीतील रक्कम जमा झाल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. गृह मंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर सायबर पोलिसांनी या खात्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यातून एजंटांमार्फत बँक खाती मिळविणे, खातेदारांना कमिशन देण्याचे आमिष दाखविणे आणि या खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम फिरविण्यासाठी करणे, अशी कार्यपध्दती समोर आली आहे. तसेच येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यानही म्युल खात्यांविषयी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील एका खासगी कंपनीचे सर्व्हर हॅक करून आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

या फसवणुकीतून मिळालेली रक्कम वर्धा जिल्ह्यातील काही तरूणांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या व्यवहारांची अधिक माहिती घेतली असता, एका तरूणाने आपल्या अन्य दहा मित्रांची चालू खाती उत्तर प्रदेशातील एका एजंटमार्फत सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. प्रत्येक खात्यामागे केवळ पाच हजार रूपये मिळतील, या आमिषाने या तरूणांनी आपली खाती वापरण्यास दिली होती. विशेष म्हणजे, ही सर्व खाती उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती हाताळत होती.

श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला होता. ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वळविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तब्बल 900 म्युल खात्यांचा वापर केल्याचे अहिल्यानगर सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात केवळ वैयक्तिक बँक खातीच नव्हे, तर काही सामाजिक संस्थांची खातीही वापरण्यात आली होती. संबंधित संस्थांच्या पदाधिकार्‍यांना कंपनीच्या सीएसआर फंडातून आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यवहारातून संस्थांना तब्बल 20 लाख रूपये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले होते. सामाजिक संस्थांचे प्रमुख असलेल्या वृध्द व्यक्तींना या आमिषाने जाळ्यात ओढण्यात आले. या वृध्द व्यक्तींना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या सामाजिक संस्थांच्या बँक खात्यांमध्ये फसवणूक करून मिळविलेली काही रक्कम जमा करण्यात आली. ही रक्कम काही वेळातच काढून घेण्यात आली. त्यानंतर संस्थांचे प्रमुख असलेल्या वृध्द व्यक्तींनी ठरल्याप्रमाणे आपले कमिशन मागितले असता, त्यांना मारहाण करून तेथून हाकलून देण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून सामान्य नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती मिळविली जातात. एटीएम कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची माहितीही घेतली जाते. त्यानंतर या खात्यांमध्ये फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करून ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळविली जाते किंवा तत्काळ काढून घेतली जाते. या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष फसवणूक करणारे गुन्हेगार पडद्यामागे राहतात. मात्र बँक खाते ज्याच्या नावावर आहे, तो खातेदार पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत येतो आणि त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.

आस्थापनांची खाती मिळविण्याचा डाव
म्युल अकाउंट मिळविण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. एखाद्या व्यक्तीला आपल्या आस्थापनासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे असते. त्यासाठी संबंधित व्यक्ती सोशल मीडियावर कर्जप्रकरणाची माहिती शोधत असते. मात्र, अपेक्षित आर्थिक व्यवहार किंवा उलाढाल नसल्याने बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करते. अशा व्यक्तींची माहिती मिळवून सायबर गुन्हेगार किंवा त्यांचे एजंट त्यांच्याशी संपर्क साधतात. तुमच्या बँक खात्यावर काही आर्थिक व्यवहार करून दिल्यास बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होईल, असे सांगितले जाते. कर्जाची निकड असल्याने आस्थापना प्रमुख अशा आमिषाला बळी पडतात आणि आपल्या बँक खात्याची माहिती एजंटला देतात. त्यानंतर हे खाते सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते.

म्युल अकाउंट म्हणजे काय ?
सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणुकीतून मिळविलेली रक्कम स्वीकारण्यासाठी आणि पुढे दुसर्‍या खात्यांमध्ये वळविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बँक खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटले जाते. ही खाती अनेकदा कमिशनच्या आमिषाने सामान्य नागरिक, व्यावसायिक किंवा सामाजिक संस्थांकडून मिळविली जातात. स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. अशा खात्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर झाल्यास खातेधारकही तपासाच्या आणि कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येऊ शकतो.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विरोधकांच्या दडपशाहीला जनता थारा देणार नाही- ना. विखे पाटील

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करण्याचा हा निर्धार आहे. हा देश संसदेतून चालेल परदेशातून नाही....