अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दुष्काळी परिस्थितीचे कारण देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा जिल्ह्यातील नेत्यांनी घातलेला घाट केवळ बैठकांपुरताच मर्यादित ठरला. प्रत्यक्षात त्याची फलनिष्पत्ती निष्फळ ठरली आणि केवळ तनाने सोबत असणारे नेते मनाने वेगवेगळे राहिल्याने बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी लंगडे पॅनल तयार झाले. यामुळे निवडणूक बिनविरोध व्हायला हवी असे मत व्यक्त करणार्या सर्वच नेत्यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी ठरली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच एकत्र आले. त्या विरोधात भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खा. निलेश लंके यांनी शड्डू ठोकला. हे सर्व करताना नेत्यांच्या तोंडी बिनविरोधाचीच भाषा होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी साद घातली. त्याला प्रतिसाद देत असल्याचे भासवत एकत्र आलेल्या विखे-थोरात यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी बैठक घेतली. मात्र या बैठकीबाबत अनेकांचे आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे आक्षेप होते. त्यानंतर सर्वच नेते निवडणूक बिनविरोध होण्यास आमचा विरोध नाही अशी भाषा बोलू लागले. रविवारी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेसाठी पुढील फेरी झाली. थोरात-विखे-शिंदे आणि माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी तालुकानिहाय बैठकांचे सत्र विजयादशमीला घेतले. त्यास जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. मात्र, या बैठकांनी दसर्याचे सिमोल्लंघन केलेच नाही.
रात्रीत घडलेल्या घडामोडीतून बिनविरोध निवडणुकीचे वारे फिरले आणि प्रत्यक्षात केवळ 9 जागाच बिनविरोध झाल्या. त्यातील बहुसंख्य तालुकानिहाय सेवा संस्थांमधील आहेत. त्या मतदारसंघावर तेथील आजी-माजी आमदारांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून बिनविरोध करून घेतल्या. प्रश्न होता तो जनरलच्या सात जागांचा. तेथे एकमत झालेच नाही. बुधवारी दुपारी दोननंतर सर्वप्रथम राम शिंदे यांनी कर्जत, जामखेड, ओबीसी आणि महिला (2 पैकी 1) अशा चार जागा परस्पर जाहीर केल्या. त्यानंतर खासदार लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे (शिंदे गट) यांनी स्वतंत्र जागा जाहीर केल्या. परिणामी विखे-थोरात विरुद्ध राम शिंदे विरुद्ध लंके- लोखंडे प्रणित असे तीन पॅनल निवडणुकीत निर्माण झाले.




