Wednesday, January 15, 2025
Homeनगरजिल्ह्यातील 13 लाख बालकांना दिल्या जाणार जंतनाशक गोळ्या

जिल्ह्यातील 13 लाख बालकांना दिल्या जाणार जंतनाशक गोळ्या

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आजपासून मोहीम सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आजपासून (4 डिसेंबर) जिल्ह्यात जंतनाशक गोळ्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील 5 हजार 852 अंगणवाडी केंद्रामधील 3 लाख 46 हजार 848 बालकांना तसेच 5 हजार 771 शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधून 9 लाख 55 हजार 406 शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण 13 लाख 2 हजार 254 विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वयोगटातील अंदाजे 28 टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणार्‍या परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. शाळा व अंगणवाडी पातळीवरून देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलामुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, नगरपालिका दवाखाने व महापालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन 4 डिसेंबर या दिवशी शाळेमधील 6 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये 1 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुलांमुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जे लाभार्थी सदर दिवशी आजारी असेल किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना 10 डिसेंबर रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये मॉप अप दिनी गोळी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. 1 ते 19 वर्ष वयोगटातील अंगणवाडी, शालेय विद्यार्थी व शाळाबाह्य मुले-मुलींनी जंतनाशक गोळी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या