अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे. दररोज सुमारे 80 हजार किलो (80 टन) सीएनजी गॅसची विक्री होते. ही मागणी सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील 64 पंपावर ग्राहकांसाठी सीएनजी उपलब्ध आहे. दरम्यान, आंध्रप्रदेश येथून श्रीगोंदा येथे आलेल्या सीएनजी गॅसच्या मुख्य पाईपलाईनला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी पाईपलाईन जोडण्यात आली आहे. त्याचे काम नगर जवळील केडगाव बायपासपर्यंत पूर्ण होवून सुरू झाली आहे. पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या लाईनचे कामही जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
इंधनाच्या वाढत्या दराला पर्याय म्हणून सीएनजी गॅसवर चालणार्या वाहनांचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी नगर जिल्ह्यात 40 ते 45 हजार किलो (40 ते 45 टन) सीएनजी गॅसची विक्री होत होती. त्यात आता दुप्पटीने वाढ झाली आहे. आता दररोज 80 हजार किलो (80 टन) सीएनजी गॅसची विक्री होत आहे. सध्या सीएनजी 95 रूपये किलो दराने मिळत असला तरी मागणी वाढत आहे. दरम्यान, कारमध्ये सीएनजी गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असला तरी अलिकडच्या काळात ट्रक, दुचाकी व जनरेटरमध्ये देखील सीएनजीचा वापर केला जात आहे. वाहनांमध्ये सीएनजी गॅसचा वापर केल्याने पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत 30 टक्के मायलेज वाढते तसेच प्रदूषण कमी होत असून इंजिनची लाईफ वाढते, यामुळे वाहनांचा वापर करणार्यांचा आर्थिक फायदा होतो. यामुळेच अलिकडच्या काळात सीएनजी कार वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मागणीतही सातत्याने वाढ होत आहे.
नवीन पाईपलाईनवर तीन ‘मदर स्टेशन’
आंध्र प्रदेश येथून पुणे, ठाणे व गुजरातकडे जाणार्या सीएनजी गॅसच्या मुख्य पाईपलाईनला श्रीगोंदा येथून नगर जिल्ह्यात व पुढे छत्रपती संभाजीनगरला पुरवठा करणारी पाईपलाईन जोडण्यात आली आहे. या पाईपलाईनचे काम नगर जवळील केडगाव बायपासपर्यंत पूर्ण झाले असून ती सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 64 पंपाला टँकरव्दारे पुरवठा करण्यासाठी श्रीगोंदा शहरात दोन व विसापूर येथे एक असे तीन ‘मदर स्टेशन’ उभारण्यात आले आहे. पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या लाईनवर आणखी ‘मदर स्टेशन’ उभे केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पंपाला कमी खर्चात व वेळात सीएनजीचा पुरवठा होणार आहे.
ऑनलाईन स्टेशनमुळे ग्राहकांची सोय
श्रीगोंदा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या पाईपलाईनवर केडगापर्यंत चार ऑनलाईन स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याव्दारे ग्राहकांना त्यांच्या वाहनात सीएनजी गॅस भरून दिला जातो. यामध्ये श्रीगोंदा शहरात दोन, कोळगाव येथे एक तर नगर जवळील अरणगाव चौक पासून एक किलोमीटरवर खडकी शिवारात एक स्टेशन उभे करण्यात आले आहे. पुढील काम पूर्ण झाल्यानंतर आणखी ऑनलाईन स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना कमी दरात सीएनजी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात सीएनजी गॅसजी मागणी सातत्याने वाढत आहे. श्रीगोंदा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या पाईपलाईनचे काम केडगाव बायपासपर्यंत पूर्ण झाले असून पुढील कामही जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या लाईनवर ऑनलाईन व मदर स्टेशनची उभारणी केली जाणार आहे.
– युवराज फळे, मॅनेजर सेल, भारत पेट्रोलियम गॅस.