Thursday, October 29, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य ठिकाणच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळणार आहे. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या आणि ज्या संस्थांच्या निवडणुकीतील नामनिर्देशनाचा टप्पा शासन आदेशापूर्वीच सुरू झाला आहे, अशा संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने 304 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि जलसंधारण यांसह विविध विभागांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी निर्माण झाली आहे. दुष्काळी नुकसानीचे पंचनामे, पीक सर्वेक्षण, शेतकर्‍यांना मदत, कर्ज पुनर्गठन, पाणीपुरवठा आणि जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था अशा कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू ठेवल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना निवडणूक प्रक्रियेत गुंतावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण आणि मदतकार्याच्या अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या सभासदांना सध्याच्या परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे गैरसोयीचे ठरू शकते, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

सहकार कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 73 कक अंतर्गत राज्य सरकारला विशिष्ट नैसर्गिक आपत्ती किंवा टंचाईच्या परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. या तरतुदीचा आधार घेत शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावरून पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेश कुणाला लागू नाही
या आदेशातून उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था आणि शासन आदेश जारी होण्यापूर्वीच ज्या संस्थांच्या निवडणुकीतील नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झाला आहे, अशा संस्थांनाही ही स्थगिती लागू होणार नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोपरगाव, राहुरीत तीन ठिकाणी छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत येथील अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव आणि राहुरी येथे तीन ठिकाणी...