श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अहिल्यानगर जिल्ह्याचा क्राईम रेट मुंबई नंतर दोन नंबरचा आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलावे लागतील, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
काल दि. 23 जून रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शहर पोलीस ठाणे येथे भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
श्री. घार्गे पुढे म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा हेवी क्राईमचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये सध्या सायबर क्राईम वाढलेला आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीकोनातून काही बदल अपेक्षित आहेत. घडलेल्या गुन्ह्यांचा विचार केला तर मनुष्यबळ फारच कमी आहे. काही नवीन पोलीस ठाणे निर्मिती तसेच मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासन दरबारी अगोदरच प्रस्ताव पाठविलेले आहेत.
सध्या जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. प्रत्येक दिवशी मोटारसायकल चोरीची एक नवीन घटना घडते. याबाबतही काही उपाययोजना कराव्या लागतील. जिल्ह्यातील ही परिस्थिती एकाच वेळी बदलणार नाही, थोडा थोडा बदल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.





