Thursday, April 9, 2026
HomeनगरAhilyanagar : 1 लिटर घातक क्रिमपासून 20 लिटर बनावट दूध

Ahilyanagar : 1 लिटर घातक क्रिमपासून 20 लिटर बनावट दूध

राहुरी, नेवासा, श्रीरामपूर तालुक्यातील संशयितांसह 31 जण रडारवर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील दूध व्यवसायाला काळीमा फासणारे आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारे बनावट दूध निर्मितीचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तपासातून उघडकीस आले आहे. पॅराफिन (मिनरल ऑइल), ‘9.5’ नावाचे रासायनिक द्रव्य, मिल्क क्रिम आणि पाणी यांचे मशीनव्दारे मिश्रण करून घातक क्रिम तयार केली जात होती. या एका लिटर क्रिमपासून तब्बल 20 लिटरपर्यंत बनावट दूध तयार करून ते बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या बनावट दूध धंद्यात सुमारे 31 जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांना गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे.

- Advertisement -

एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी छापा टाकून बनावट दूध तयार करण्याचा धंदा उघडकीस आणला होता. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात समीर कमरूद्दीन शेख (रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग गुन्ह्याचा तपास करीत आहेत. त्यांच्या तपासातून बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रिमची निर्मिती, त्याची विक्री व त्यापासून तयार होणार्‍या दूधाची विक्री, या बनावट दूध धंद्यात कोणाचा सहभाग आहे, याचे धागेदोरे उघडकीस आले आहे.

समीर शेख व आफताब शेख यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शिवारात एक गोडाऊन भाडेतत्वावर घेतले होते. त्या ठिकाणी काही मशीन उपलब्ध होत्या. समीर व आफताब हे आपल्या पाच साथीदारांच्या मदतीने बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारी घातक क्रिमची निर्मिती त्याठिकाणी करत होते. तयार झालेली क्रिमची विक्री मार्केटमध्ये केली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा आदी तालुक्यासह बीड जिल्ह्यात याची विक्री होत होती. या क्रिमपासून थेट बनावट दूध तयार करून ते विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एलसीबीने देवळाली प्रवरा येथील गोडाऊनवर धाड टाकली असता तेथील मशीन गायब असल्याचे आढळले. तपासानुसार, समीर व आफताब यांच्या नातेवाईकांनी या मशीन गायब केल्याचा संशय असून त्यांनाही गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे.

नफ्याचा ‘काळा फॉर्म्युला’
दूध खरेदी करताना डेअरी चालकांकडून फॅट व एसएनएफ (डिग्री) तपासणी केली जाते. हेच निकष फसवण्यासाठी या रॅकेटने ‘रासायनिक फॉर्म्युला’ वापरला. क्रिममध्ये पॅराफिनचा वापर केल्याने कृत्रिमरित्या फॅट वाढवले जात होते. एसएनएफ (डिग्री) वाढवण्यासाठी ‘वे’ पावडरचा वापर केला जात होता. यामुळे पूर्णपणे कृत्रिम आणि आरोग्यास घातक असे बनावट दूध तयार होत होते. दूधात भेसळ न करता पूर्ण दूधच बनावट तयार केला जात असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे.

जनावरे नसणार्‍यांकडून दूध विक्री
संशयित आरोपी स्वतः शेतकरी किंवा दूध उत्पादकांना संपर्क साधून बनावट दूध कसे तयार करावे आणि ते डेअरीत कसे विकावे याचे प्रशिक्षण देत होते. धक्कादायक बाब म्हणजे, काही जणांकडे शेती किंवा जनावरे नसतानाही ते मोठ्या प्रमाणात बनावट दूध तयार करून त्याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. अशा दूध विक्रेत्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दबावाची शक्यता; पण कठोर भूमिका
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार एलसीबीकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तपास करीत आहेत. 31 संशयित निष्पन्न झाले असले तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अटकसत्र राबविले जाण्याची शक्यता आहे. एलसीबीसमोर आता संशयितांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान आहे. या कारवाईचा पुढील टप्पा किती व्यापक आणि सखोल होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

31 संशयित निष्पन्न
या बनावट दूध रॅकेटमध्ये एकूण 31 जणांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामध्ये आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरूण पाठक (रा. भिवंडी, मुंबई), जगदाळे (पूर्ण नाव माहिती नाही. रा. नेवासा फाटा), हरिदास गोपाळघरे (रा. जामखेड), गांधी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. केडगाव), के. के. फुड्स (रा. तारकपूर, अहिल्यानगर), शाकिर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बर्डे (तिघे रा. राहुरी), सुनील ढोकणे, राजू ढोकणे (दोघे रा. उंबरे, ता. राहुरी), रंगनाथ ढुस (रा. देवळाली प्रवरा), नामदेव कोहोकडे (रा. राहुरी), सतीष पठारे, दत्तात्रय करांडे, दत्तात्रय कराळे, महेश मोकाटे (तिघे रा. अहिल्यानगर), शामराव माने (रा. आष्टी, जि. बीड), दत्ता शिंदे (रा. पाटोदा, जि. बीड), नितीन केकाण (रा. निफाड, जि. नाशिक), राहुल पवार (रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी), संजय गुंड (रा. बीड), अनिल साळवे (रा. जोशी वस्ती, वॉर्ड नंबर 3, श्रीरामपूर), बाजीराव क्षीरसागर (रा. विंचुर, जि. नाशिक), किरणकुमार रोहकले (रा. वॉर्ड नंबर 3, श्रीरामपूर), अनिकेत दरंदले (रा. नेवासा), लक्ष्मण करंजुले (रा. पारनेर), वैभव हांडे (रा. जुन्नर, जि. पुणे), मनीष पटेकर, गौरव पटेकर (दोघे रा. राहुरी) यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...