नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
२१ जून २०२६ रोजी होणाऱ्या ‘नीट’ (NEET UG) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्रालय आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः टेलिग्रामसारख्या ॲप्सवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता राखण्यासाठी भारतात टेलिग्रामच्या वापरावर २२ जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही निर्बंध घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने या निर्णयाचे स्वागत केले असून, गेल्या काही काळात टेलिग्रामचा वापर करून काही टोळ्या NEET UG उमेदवारांची दिशाभूल करत असल्याचा दावा केला आहे. पेपर लीक झाल्याचे खोटे दावे, बनावट प्रश्नपत्रिका आणि पुनर्परीक्षेबाबत चुकीची माहिती पसरवून विद्यार्थ्यांकडून हजारो लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
या निर्णयामागील मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या. NTA च्या माहितीनुसार, काही टेलिग्राम चॅनेल्स विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना NEET ची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत होते. या नावाखाली हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती.
एनटीएच्या म्हणण्यानुसार, “पेपर लीक”, “नीट री-एग्जाम २०२६” अशा नावांची अनेक चॅनेल्स आढळून आली. या माध्यमांतून विद्यार्थ्यांना कथित प्रश्नपत्रिका किंवा विशेष माहिती देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा मागितल्या जात असल्याचा आरोप आहे. टेलिग्राममधील एडिट फीचरचा गैरवापर होत होता. काही अॅडमिन जुन्या फाईल्स बदलून त्याजागी नवीन फाईल्स अपलोड करत होते. मात्र, मूळ टाइमस्टॅम्प कायम राहत असल्याने परीक्षा झाल्यानंतरही “प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध होती” असा भास निर्माण केला जात होता. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत होते.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकार आणि NTA ने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. NTA ने मान्य केले की या निर्बंधांमुळे अनेक सामान्य टेलिग्राम युजर्सना काही काळ अडचणी येऊ शकतात. मात्र परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता हे पाऊल आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
विद्यर्थ्यांना एनटीएने केले आवाहन
“देशभरातील लाखो नागरिक, तरुण आणि व्यावसायिक हे शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि वैयक्तिक संवादासाठी दैनंदिन जीवनात टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. या तात्पुरत्या बंदीमुळे सर्वसामान्य युजर्सना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागलेल्या ‘नीट-युजी २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची विश्वासार्हता आणि पवित्रता जपण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत अनिवार्य होते.” हा निर्णय केवळ मर्यादित कालावधीसाठीच घेण्यात आला असून, २१ जूनची मुख्य फेरपरीक्षा सुरक्षित आणि चोख वातावरणात पार पडल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२१ जूनच्या नीट परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.




