अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस दलातील बदल्यांच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई अशा एकूण 84 पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्या केल्या आहेत. याचबरोबर जून 2026 मध्ये करण्यात आलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये असमाधानी असलेल्या 37 अंमलदारांच्या बदल्यांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली असून काही अंमलदारांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) बळकटी देण्यासाठी 16 अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश शनिवारी (25 जुलै) रात्री जारी करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील बदल्यांची व्यापक प्रक्रिया हाती घेतली होती. या प्रक्रियेत स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींसह जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अधिकार्यांच्या तसेच पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्याही करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय बदल्यांनंतर अनेक अंमलदारांनी आपल्या बदलीमध्ये बदल करण्यासाठी अर्ज सादर केले होते. या अर्जांवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी वैयक्तिक पातळीवर विचार करून पात्र प्रकरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
काही अंमलदारांच्या बदल्या रद्द करून त्यांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली, तर काहींची बदली एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासकीय बदलीसाठी पात्र नसलेल्या अनेक अंमलदारांनीही विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र शेकडो अर्ज प्राप्त झाल्याने तसेच विविध पोलीस ठाण्यांतील रिक्त पदांचा विचार करून मर्यादित प्रमाणातच विनंती बदल्या मंजूर करण्यात आल्या. उर्वरित अर्जदारांची विनंती अमान्य करून त्यांचे अर्ज दप्तरी दाखल करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विनंती बदल्यांमध्ये एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पाच सहायक फौजदार, 26 पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि 47 पोलीस शिपाई अशा एकूण 84 अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय जून 2026 मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये 37 अंमलदारांच्या बदल्यांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली आहे. यात दोन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सात सहायक फौजदार, 14 पोलीस हवालदार, दोन पोलीस नाईक आणि 12 पोलीस शिपायांचा समावेश असून काहींना एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे, तर काहींची नवीन ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
एलसीबीत 16 जणांची नियुक्ती
प्रशासकीय बदल्यांच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेत कोणत्याही अंमलदाराची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. मात्र विनंती बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा विचार करून 16 अंमलदारांना एलसीबीमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपास, गुन्हे उघडकीस आणणे, आरोपींचा शोध घेणे आणि विशेष कारवाया राबविण्यात स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वाची भूमिका असते. वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एलसीबीचे मनुष्यबळ वाढविणे आवश्यक असल्याने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.




