अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीनंतर नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (10 जून) सायंकाळनंतर अहिल्यानगर शहर, उपनगर व दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात वादळी वार्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वादळी वार्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.
सुमारे अर्धा ते एक तास हा पाऊस सुरू राहिला. शहर व उपनगरातील अनेक भागांत झाडांची फांद्या तुटल्या, तसेच काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. वादळी वार्यामुळे हातगाड्यांवर विक्री करणार्या लहान व्यापार्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली.
दरम्यान, दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागांत वार्याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी शेतीच्या पीकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांमध्ये देखील काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आधीच शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाने उपस्थिती लावल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही भागांत खरिपाच्या पेरण्यांच्या तयारीला वेग आला असला, तरी अचानक येणार्या वादळी पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
सोनई, चांद्यातही तडाखा
सरपंचांच्या घरावर झाड कोसळले, शिक्षकाच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान, कांदा भिजला
सोनई/ शनिशिंगणापूर |वार्ताहर|Sonai
काल सायंकाळी आठच्या दरम्यान सोनई, शनिशिंगणापूर, धनगरवाडी, मोरया चिंचोरे, पानसवाडी येथे तुफान वार्यासह पाऊस पडला. या वादळामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शेतकर्यांची कांदा चाळीतील कांदा भिजला. विद्युत खांब, मोठी मोठी झाडे कोसळली. विजेच्या तारा तुटून पडल्या. काही ठिकाणी डीपी चे पोल पडले. झाडे पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ जेसीबीच्या साह्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. काही ठिकाणी चार चाकी वाहनावर झाडे पडल्याने मोठे नुकसान झालेले आहे. कांगोणी गावात सरपंच सोमनाथ कराळे यांच्या घरावर लिंबाचे झाड व नव्या वांबोरी रोडवरील शिक्षक भागवत वीरकर यांच्या चार चाकी नव्या वाहनावर झाड कोसळले.
नेवासा तालुक्यातील चांदा-बर्हाणपूर परिसराला आज सायंकाळी झालेल्या प्रचंड वादळाने मोठे नुकसान झाले असून वादळासोबतच पाऊसही झाला आहे . सायंकाळी सात वाजता अचानक वादळाला सुरुवात झाली. या वादळाने या परिसरात शेकडो झाडे पडली तर वीज पुरवठाही खंडीत झाला. प्रचंड वादळाने अनेक भागात पोल पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे वादळाने भुसर्यात ठेवलेले कांदाही अनेक ठिकाणी भिजले आहेत. काही घराचं नुकसान झाले असून या वादळाने किती नुकसान झाले या अंदाज घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते.





