Saturday, June 13, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बीएसएनएल, महावितरणच्या चोरी गेलेल्या दोन कोटी रुपयांच्या केबल...

Nashik Crime News : बीएसएनएल, महावितरणच्या चोरी गेलेल्या दोन कोटी रुपयांच्या केबल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महावितरण कंपनीच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक गुन्हे शाखेला (Nashik Crime Branch) यश आले. याप्रकरणी सहा संशयितांना अटक (Arrested) करत त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी ८८ लाख ४० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Road Police Station) हद्दीत २०२४ मध्ये बीएसएनएल कार्यालयाजवळील भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम केबल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट १ चे पथक करत असताना अटक संशयितांकडून चौकशीदरम्यान चोरीचा माल मुंबईतील भांडूप येथील एका गोदामात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भांडूप येथील गोदामावर छापा टाकला. या कारवाईत (Action) साडेसतरा टन विविध प्रकारच्या अॅल्यूमिनियम केबल, साडेचौदा टन जेलिफिल्ड वायरमधून वेगळे केलेले कॉपर तसेच दीड टन अॅल्युमिनियम केबल असा एकूण २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बाहाब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ, बसंतलाल राजाराम यादव, कमलेशकुमार सुखदेव रविदास, तनवीर मुफसीर शेख आणि राजकुमार केशुलाल जैन यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान संशयितांकडून सरकारवाडा, मुंबईनाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील केबल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ही कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुख्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, उपनिरीक्षक किरण शिरसाठ, हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे, अंमलदार समाधान पवार यांनी सहभाग घेतला. तसेच गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व त्यांच्या पथकाने तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे आणि भगवान जाधव यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ करत आहे.

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...