Sunday, April 26, 2026
HomeनगरAhilyanagar : राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगरसह पाथर्डीला अवकाळी पावसाचा तडाखा

Ahilyanagar : राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगरसह पाथर्डीला अवकाळी पावसाचा तडाखा

41 गावांतील 7352 शेतकर्‍यांचे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील अनेक जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) सायंकाळी ते रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकर्‍यांची दाणादाण उडवली. यात नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश असून या ठिकाणच्या 41 गावांतील 7 हजार 352 शेतकर्‍यांचे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांना दणका बसला आहे.
यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व गारपिटीमुळे राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डीला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे.

- Advertisement -

नगरसह राज्यभर गेल्या आठ दिवसांपासून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे किमान शेतकरी सतर्क झाले आणि काढणीला आलेले पिके वेगाने काढण्यात आली. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झाला. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी ते रात्रीपर्यंत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटात दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वार्‍यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका पिक आडवे झाले आहे.

बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वातावरणात बदल होवून आकाशात ढग जमा झाले आणि तासाभरात वादळी पावसाला सुरूवात झाली. यात नगर तालुक्यातील 5 गावातील 33 टक्क्यांपेक्षा अधिक 930 हेक्टरवरील 1 हजार 445 शेतकर्‍यांचे, पाथर्डी तालुक्यातील 2 गावांतील 160 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक, 41 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील 8 गावांतील 355 हेक्टरवरील 700 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांच्या आत तर 1 हजार 726 हेक्टरवरील 4 हजार 315 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांच्या आत असे 5 हजार 15 शेतकर्‍यांचे 2 हजार 61 हेक्टरवरील एकून नुकसान झालेले आहे. अकोले तालुक्यातील 6 गावांत 38 हेक्टरवरील पिकांचे 194 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक आणि राहाता तालुक्यातील 3 गावांतील 25 शेतकर्‍यांचे 16.5 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.

ऐन सणाच्या दिवशी कृषी व महसूल शेतकर्‍यांच्या बांधावर
बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानंतर गुरूवारी सकाळी ऐन पाडव्या दिवशी जिल्ह्यात नुकसान झालेल्या राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डी तालुक्यात कृषी विभागाचे कर्मचारी व तलाठी यांनी भेट पंचनामे करण्याच्या कामाला सुरूवात केली. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पूर्व मोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप 100 टक्के भरपाई मिळालेली नसतांना नव्याने बेमोसमी पावसामुळे नुकसान होण्यास सुरूवात झाली आहे.

सर्वाधिक फटका बसलेली पिके
गहू, कांदा, मका, भूईमूग, हरभरा, टरबूज, चारापिके, फळपिके, आंबा, डाळींब, संत्रा, बाजारी, भाजीपाला, टोमॅटो, द्राक्षे या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.

शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या
तात्काळ पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई जाहीर करा. पीकविमा दावे जलद निकालीकाढा. फळबागांसाठी विशेष आर्थिक मदत द्या. चार्‍याच्या टंचाईवर उपाययोजना करा, अशा मागण्या शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात येत आहेत.

ढवळपुरीला प्रचंड गारपीट
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावमध्ये गुरुवारी सांयकाळी पाच ते सहाच्या दरम्यान प्रचंड गारपीट झाली. यावेळी गारांचा पाऊस झाला. यात कांदा, चारा पिकासह कलिंगड या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मागील वर्षी सुद्धा ढवळपुरी भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात देखील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. काल पाडव्याच्या दिवशी झालेल्या गारपीटीत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उपनगर पोलीस ठाणे (Upnagar Police Station) येथे तक्रार मागे घेण्याच्या वादातून एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक...