अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर वगळता 10 विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रे पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील 74 मतदान केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, एका मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी 47 हजार 200 रूपयांचे शुल्क निवडणूक आयोगाकडून आकारले जाते. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे (जिल्हा कोषागार) 10 उमेदवारांनी मिळून एकूण 34 लाख 92 हजार 800 रूपयांचे शुल्क जमा केले आहे.
निवडणूक निकालानंतर मतदान यंत्र पडताळणीसाठी 7 दिवसांत अर्ज करण्याची मुदत होती. ही मुदत काल, शुक्रवारी संपुष्टात आली. अखेरच्या दिवशी शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी 2 मतदान केंद्रातील यंत्रे पडताळणीसाठी तर शेवगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार प्रताप ढाकणे यांनी शेवगावमधील 2 तर श्रीगोंदे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी 2 मतदान केंद्रातील यंत्रे पडताळणीसाठी अर्ज दाखल केले.
यापूर्वी बाळासाहेब थोरात (काँग्रेस) यांनी संगमनेरमधील 14, शंकरराव गडाख (शिवसेना उध्दव ठाकरे गट) यांनी नेवासा मतदारसंघातील 10, राणी लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी पारनेरमधील 18, भाजपचे राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील 17, अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातील 3, प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी शरद पवार गट) राहुरी मतदारसंघातील 5 तर कोपरगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार संदीप वर्पे यांनी पोहेगाव या एका मतदार केंद्रातील यंत्र पडताळणीसाठी शुल्क जमा करून जिल्हाधिकार्यांकडे अर्ज दाखल केला आहे.
या अर्जानुसार व्हीव्हीपॅट, बीयु व सीयु असे मतदान यंत्रांची पडताळणी केली जाईल. मात्र त्यासाठी या मतदारसंघातील निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले जाते का याची प्रतीक्षा केली जाईल. ही प्रत्यक्ष 45 दिवसांची आहे जर न्यायालयात आव्हान दिले गेले असेल तर न्यायालयाच्या परवानगीने व आव्हान दिले गेले नसेल तर 45 दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे.