Sunday, July 26, 2026
HomeनगरCrop Loss : 23 हजार शेतकर्‍यांना 19 कोटींची नुकसान भरपाई

Crop Loss : 23 हजार शेतकर्‍यांना 19 कोटींची नुकसान भरपाई

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

यंदा एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि फळबागांचे नुकसान झाले होते. या आपत्तीग्रस्त परिस्थितीत तब्बल 23 हजार 445 शेतकर्‍यांना 18 कोटी 93 लाख सहा हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. भरपाईची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 10 हजार 648 हेक्टर क्षेत्र या अवकाळी पावसाच्या तडाख्याने बाधित झाले. विशेषतः दक्षिण जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, नगर आणि पाथर्डी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. फळबागांसह उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या पावसामुळे आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, द्राक्षे, पपई यांसारख्या फळबागा उध्दवस्त झाल्या.

त्यासोबतच मका, कांदा, भुईमूग, उन्हाळी बाजरी यांसारख्या पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 48(2) नुसार स्थापन करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या निधीमध्ये केंद्र शासनाचा 75 टक्के व राज्य शासनाचा 25 टक्के हिस्सा असतो.

दरम्यान, नुकसान झालेल्या भागात कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून संयुक्त पंचनामे केले होते. वेळेवर पंचनामे पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी आणि अधिकार्‍यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. या पंचनाम्यांवर आधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवले गेले, आणि त्यावर तत्काळ निर्णय घेऊन भरपाई मंजूर करण्यात आली.

एप्रिल महिन्यात 4 हजार 127 हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन 7 हजार 268 शेतकरी बाधित झाले होते. त्यापोटी एकुण 7 कोटी 18 लाख 86 हजार रूपये भरपाई मंजूर झाली आहे. तसेच मे महिन्यात 6 हजार 521 हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन 16 हजार 177 शेतकरी बाधित झाले होते. त्यापोटी 11 कोटी 74 लाख 20 हजार रूपये भरपाई मंजूर झाली आहे.

निधी हस्तांतरास बंदी

भरपाईची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. कर्ज खात्यात किंवा अन्य खात्यांमध्ये निधी वळवू नये, असा स्पष्ट आदेश प्रशासनाकडून बँकांना देण्यात आला आहे. निधी वितरित झाल्यानंतर शेतकर्‍यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...