
मुंबई | Mumbai
नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशानंतर आज (रविवारी) मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील वीर सावरकर मार्गावर भव्य ‘विजयी सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की,”ठाकरे बंधूंना (Thackeray Brothers) आनंदोत्सव (सेलिब्रेशन) साजरा करण्यासाठी काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे. शेवटी हे प्रश्न कोणत्याही एका पक्षाचे किंवा व्यक्तीचे नसून संपूर्ण तरुणाईचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संवेदनशीलता दाखवत देशाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी सोमवारी लोकसभेत एक कठोर कायदा आणला जाणार असून, जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेही झाला नसेल”, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Raj Thackeray : ‘जेन झी’ पिढीने सरकारच्या झिंज्या उपटल्या; विजयी सभेतून राज ठाकरेंचा निशाणा
तसेच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांत अशा प्रकारचे डायलॉग अनेकदा मारले गेले आहेत, पण त्याचा कोणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण भारत देश मोदीजींच्या पाठीशी आहे.रात्री एक वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातील रेकॉर्ड तोडतो, यावरूनच लक्षात येते की भारत कोणाच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी म्हटले.
मी महाराष्ट्रातच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल (शनिवारी) तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यावरही आज फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की,”मी आज नागपूरात आहे आणि संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे. जे दिलं आहे ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं असे म्हणत फडणवीसांनी दिल्लीत जाण्याच्या सर्व शक्यता आणि चर्चांवर स्पष्टपणे पडदा टाकला आहे.
हे देखील वाचा : अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला…; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला




