अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू होणार्या अहिल्यानगरच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी दरवर्षी 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगीपत्र देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दाखल करण्यात आलेले दुसरे अपील मान्य केले आहे. तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला महाविद्यालयास मान्यता देण्याबाबत अवगत करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असून, यंदाच 100 विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत महाविद्यालयामार्फत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे दुसरे अपील दाखल करण्यात आले होते. या अपीलावर दुसर्या अपील समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुपालनार्थ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपील मान्य केले आहे.
मंत्रालयाच्या निर्णयानुसार, 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अहिल्यानगर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी दरवर्षी 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता ठेवून परवानगीपत्र देण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला अवगत केले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी स्थानिक पातळीवर एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यासोबतच वैद्यकीय उपचारांच्या सुविधांमध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपचार माफक दरात उपलब्ध होण्यास मदत होऊन त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश लांब यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.




