नाशिक | प्रतिनिधी
वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवून सुसाट धावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने (RTO Department) कार्यान्वित केलेली मोबाइल वाहतूक अंमलबजावणी प्रणाली अर्थात रडार इंटरसेप्टर यंत्रणा नाशिककरांसाठी तिसरा डोळा ठरली आहे. या आधुनिक यंत्रणेद्वारे ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात आलेल्या एकूण ३९ हजार १३५ कारवायांचे विश्लेषण केले असता, एकट्या विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण तब्बल ७४.६३ टक्के २९,२०७ कारवा ई केली असल्याचे समोर आले आहे.
रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत जिल्ह्यात ही प्रणाली राबवली जात आहे. केवळ चौकाचौकात उभे राहून कारवाई करण्याऐवजी आरटीओची तीन विशेष रडार इंटरसेप्टर वाहने जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट्स), महामार्ग आणि नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गस्त घालत आहेत. या यंत्रणेच्या कचाट्यातून नियमांचे उल्लंघन करणारे चालक सुटू शकत नसल्याने बेशिस्त वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. विनाहेल्मेट प्रवासानंतर सर्वाधिक कारवाया या अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांविरोधात (९,३८८) झाल्या आहेत.
Sanjay Raut: शायना एनसींच्या अडचणी वाढणार? संजय राऊतांनी थेट फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी
तसेच, वाहनांना नियमानुसार उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) नसल्याप्रकरणी ६ हजार ८६४ चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. चारचाकी चालकांमध्ये विनासीटबेल्ट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय असून, ३ हजार ४८२ जणांवर कारवाई झाली आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार ६९ चालकांनाही यंत्रणेने टिपले आहे. ई-चलनद्वारे दंड आकारण्यावरच आरटीओ प्रशासन थांबलेले नाही, तर वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर चालकांचे वाहनचालक परवाने (लायसन्स) निलंबित करण्याची कठोर पावलेही उचलली जात आहेत. यापुढेही रडार यंत्रणेद्वारे ही धडक मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी दिला आहे.
आकडेवारीचा आरसाः कोणत्या नियमाचे किती उल्लंघन ?
(ऑक्टोबर २०२६ पर्यंतची एकूण कारवाई ३९,१३५)
उल्लंघन कारवाई संख्या कारवाई प्रमाण
विनाहेल्मेट प्रवास २९,२०७ ७४.६३ %
वेगाने वाहन चालवणे ९,३८८ २३.९९ %
एचएसआरपी नंबर नसणे ६,८६४ १७.५४%
विनासीटबेल्ट ३,४८२ ८.९०%
ट्रिपल सीट १,०६९ २.७३ %



