अहिल्यानगर (प्रतिनिधी)
हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून दिलासा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील बळीराजाने पीक विमा योजनेचा आधार घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात खरीप २०२५ च्या तुलनेत यंदाच्या (२०२६) खरीप हंगामात शेतकरी सहभाग आणि संरक्षित रक्कम या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल १ हजार ४७२ कोटींचे पीक विमा सुरक्षा कवच घेतल्याचे दिसत आहे.
२०२५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख २४ हजार १४५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४ लाख ५१ हजार १४९ अर्ज केले होते. त्यातून २ लाख ३८ हजार ८७२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होते आणि १ हजार २३६.१७ कोटी रूपयांची बिमा भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (२०२६ च्या खरीप हंगामात) शेतकऱ्यांच्या संख्येत ३५ हजार १४७ ने वाढ झाली असून, एकूण २ लाख ५९ हजार २९२ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे.
त्यामुळे यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना १ हजार ४७२.१४ कोटींचे सुरक्षा छत्र उपलब्ध होणार असून, यामध्ये २ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पारनेर, जामखेड आणि अहिल्यानगर या तालुक्यांमध्ये शेतकरी संख्या आणि विम्याचे संरक्षण मूल्य यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने या विम्याचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा आर्थिक भार कमी झाला असून, कमी खर्चात १ हजार ४७२ कोटींपेक्षा जास्त रकमेची जोखीम विमा कंपनीकडे वर्ग झाली आहे.
एकट्या सोयाबीनलाच ८८० कोटींचे संरक्षण
यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीक विमा घेतला आहे. सोयाबीनसाठी २ लाख ३३ हजार ६३७ अर्ज दाखल झाले असून, ८८० कोटींचे विमा संरक्षण कवच मिळाले आहे. त्यापाठोपाठ कापूस उत्पादकांनी ६५ हजार ७३३ अर्जाद्वारे २३२ कोटींचे, तर तूर उत्पादकांनी ५१ हजार ८१७ अर्जाद्वारे १२४ कोटींचे विमा संरक्षण मिळवले आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार
यंदा पावसाच्या खंडामुळे आणि पिकांवरील कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पीक विमा संरक्षण घेतल्यामुळे शेतकर्यांना मोठे आर्थिक स्थैर्य आणि भरपाईचा भक्कम आधार मिळणार आहे.




