नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. शहरात दरोडा टाकणे आणि जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने झारखंडहून (Zharkhand) नाशकात दाखल झालेल्या सहा सराईत संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी मेळा बसस्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे मोबाईल आणि एक चॉपर (लोखंडी कोयता) जप्त केला आहे. न्यायालयाने या सर्व संशयितांना २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंहस्थाच्या (Simhastha) दृष्टीने शहरातील बसस्थानके, रेल्वे स्टेशन आणि मुख्य बाजारपेठांमध्ये परराज्यांतील भाविकांची व प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन धुमाकूळ घालण्याचा कट या झारखंडी टोळीने आखला होता. अवघ्या दोन दिवसांपूर्वी हे सहाही जण रेल्वेने नाशकात आले होते. त्यांनी शहरातील काही महत्त्वाच्या भागांची रेकी करून दरोडा आणि जबरी चोरी करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्याने शहरातील अनर्थ टळला आहे.
२९ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानक व ठक्कर बाजार परिसरात काही तरुण हत्यारांसह संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एक व सरकारवाडा पोलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मेळा बसस्थानक परिसरात तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने घेराव घालत सहाही जणांना पकडले.
तीन पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघड
ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल नऊ महागडे मोबाईल फोन आणि घातक लोखंडी चॉपर आढळून आला. यात संशयितांचे स्वतःचे ६ मोबाईल आणि शहरातून चोरी केलेल्या ३ मोबाईलचा समावेश आहे. या अटकेमुळे सरकारवाडा, नाशिकरोड आणि पंचवटी या तीन पोलीस ठाण्यांत (Police Station) दाखल असलेले तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेले संशयित
अमित हरीलाल महतो, सोहकुमार अरवा महतो, रोशनकुमार नेपाली महतो, सनीकुमार बाडीस महतो, महंमद इतेसार आलम सलीम शेख आणि रोहन अरवा महतो (सर्व रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंहस्थाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून शहरातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळेच ही आंतरराज्यीय टोळी गुन्हे करण्यापूर्वीच जाळ्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करत आहेत.




