नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिक्षणाच्या पवित्र मंदिरात बोगस आयडीच्या आधारे शासनाची १६० कोटी रुपयांची लूट करणाऱ्या सिंडिकेटचा बुरखा फाडण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) आता मिशन सर्जिकल स्ट्राइक सुरू केले आहे. नाशिक विभागातील (Nashik Division) नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संशयित शाळांमध्ये पोलिसांच्या ११ विशेष पथकांनी लॅपटॉप, प्रिंटर आणि कॅमेऱ्यांसह अचानक धडक दिली आहे. या धाडसत्रामुळे शिक्षण माफिया, बोगस शिक्षक आणि संस्थाचालकांचे धाबे दणाणले असून, विभागातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक विभागात आढळलेल्या एकूण ८४१ बोगस शालार्थ आयडीपैकी (Shalarth ID Scam) तब्बल ६३८ आयडी (७५.८६ टक्के) हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. जळगाव हे या घोटाळ्याचे एपिसेंटर ठरल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ५ विशेष पथके एकट्या जळगावात तैनात केली आहेत. धाडी सुरू होताच जळगावात संशयितांची पळापळ सुरू झाली असून, कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागला आहे. पोलिसांचे हे धाडसत्र गाेपनीय आणि नियोजनबद्ध सुरू आहे. पोलिसांचे ताफे साध्या वेशात शाळांमध्ये धडकत असून शाळांचे मस्टर, जुनी वेतन बिले, मूळ नियुक्ती पत्रे आणि आवक-जावक रजिस्टर ताब्यात घेत आहेत.
केवळ कागदपत्रेच नाही, तर बनावट कागदपत्रे कुठे व कशी छापली गेली, याचे डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी लॅपटॉप आणि प्रिंटरचा वापर करून जागीच पंचनामे केले जात आहेत. दरम्यान, मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाणच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मनोज पाटील, निलेश पाटील, दत्तात्रय पाटील, तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी, स्वतः फिर्यादी भाऊसाहेब चव्हाण याच्यासह तब्बल १२८ संशयित आहेत. त्यातील जळगाव नंदूरबारमधील बरेच मोठे मासे लवकरच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
१२६ जणांचा फौजफाटा
उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली ४६ अधिकारी आणि ८० हून अधिक अंमलदार या कारवाईत रात्रंदिवस एक करून काम करत आहेत. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल दाेन गुन्ह्यांच्या तपासात आतापर्यंत १,२०० हून अधिक संशयित निष्पन्न झाले आहेत.
अटक सत्र
माजी शिक्षण उपसंचालक, शिक्षण मंडळाचे निवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी, भाजप पदाधिकारी संजय गरूड, दीपक गरूड, शशिकांत हिंगोणेकर, तुषार साळुंके, किरण पाटील राहुल पवार, प्रशांत वाडीले या आठ मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तपासाचा धागा आता उच्च पदस्थ अधिकारी आणि बड्या संस्थाचालकांपर्यंत पोहोचला असून, येत्या २४ ते ४८ तासांत शिक्षण क्षेत्रातील काही बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.




