Thursday, November 12, 2026
Homeक्राईमAhilyanagar : अहिल्यानगरात 30 लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त

Ahilyanagar : अहिल्यानगरात 30 लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त

कारसह तिघे ताब्यात || दोघे पसार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरात तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (19 जुलै) धडक कारवाई करत सुमारे 30 ते 32 लाख रुपये किमतीचे 150 ते 160 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत संशयास्पद विनाक्रमांकाच्या स्विफ्ट कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातील अन्य दोघे संशयित पसार झाले आहेत. जिल्ह्यात एकाच कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त होण्याची ही पहिलीच मोठी घटना मानली जात असून, त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक मिस्किनमळा परिसरात गस्त घालत असताना विनाक्रमांकाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. कारवाईची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण पसार झाले. तर झिशान शौकत सय्यद, रेहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर वाहनाची कसून झडती घेतली असता 150 ते 160 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. तसेच पिस्तुलासारखे दिसणारे एक लायटर, एक एअर गन, मास्क, कटावणी आणि दरोडा टाकण्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. प्राथमिक तपासणीत जप्त केलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे 30 ते 32 लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात वसीम खलील बागवान (वय 38, रा. पिंजर गल्ली, चाचा मेससमोर), झिशान शौकत सय्यद (वय 27, रा. सहारा कॉलनी, मुकुंदनगर) आणि रेहान जावेद शेख (वय 24, रा. छोटी मशीद, मुकुंदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जमीर भाई आणि एक अनोळखी इसम पसार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अमली पदार्थांचा पुरवठा कोणत्या रॅकेटमार्फत होत होता, जप्त साहित्याचा नेमका वापर कशासाठी होणार होता आणि पसार आरोपींची भूमिका काय आहे, याचा तपास तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...