अहिल्यानगर । प्रतिनिधी
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचे नाट्य पाहायला मिळाले. एका बाजूला सत्ताधारी महायुतीकडून भाजपने आपली रणनीती स्पष्ट ठेवली असताना, दुसऱ्या बाजूला विरोधी महाविकास आघाडीमध्ये (MVA) मात्र पुरता गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या हायव्होल्टेज ड्रामामध्ये दिग्गज इच्छुकांनी अचानक माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत सोपी झाली आहे.
या मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ५ उमेदवारांचे एकूण ८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपकडून प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून एकही अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठी उत्सुकता नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीबाबत होती. राणी लंके या विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार, अशी ठाम माहिती त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष वेळेला लंके यांनी अर्ज दाखल केलाच नाही.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. त्यांच्या समर्थकांनी तर सचिन जगताप रिंगणात उतरणार असल्याचे जाहीरच केले होते. परंतु, अनपेक्षित घडामोडींनंतर त्यांनीही शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता निवडणुकीतून ‘यू-टर्न’ घेतला.
या संपूर्ण प्रक्रियेत महाविकास आघाडीमधील अंतर्गत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. काँग्रेसचे नेते करण ससाणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती, परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना ऐनवेळी ‘एबी फॉर्म’ (AB Form) दिला नाही. पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्यामुळे करण ससाणे यांनी अखेर अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.
रिंगणात उरलेले उमेदवार
प्राजक्त प्रसाद तनपुरे (भारतीय जनता पक्ष – भाजप)
करण ससाणे (अपक्ष)
कमलेश हस्तीमल गांधी (अपक्ष)
मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ (अपक्ष)
दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे (अपक्ष)
महाविकास आघाडीच्या या अंतर्गत गोंधळामुळे आणि लंके-जगताप या बड्या नेत्यांच्या माघारीमुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचे पारडे कमालीचे जड झाले असून, ही निवडणूक आता त्यांच्यासाठी केवळ एक औपचारिकता उरल्याचे बोलले जात आहे.




