Monday, June 1, 2026
Homeक्रीडाNashik Crime News : विषारी दारूनंतर आली जाग; नाशिकला चार दिवसांत ५२...

Nashik Crime News : विषारी दारूनंतर आली जाग; नाशिकला चार दिवसांत ५२ गुन्हे, तर ३२ जणांना बेड्या!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुण्यातील (Pune) हडपसर व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे २१ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेनंतर गृहखात्याने तब्बल २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली. पण, या कारवाईची (Action) खरी धग आता नाशिक जिल्ह्यात जाणवू लागली आहे. एवढा मोठा अनर्थ घडेपर्यंत सुस्त बसलेल्या नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना अचानक जाग आली असून, गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर धडक कारवायांचा धडाका सुरू झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, एकट्या २८ ते ३१ मे या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) ५२ गुन्हे दाखल करत ३२ संशयितांची धरपकड केली आहे. संपूर्ण मे महिन्यात झालेल्या एकूण कारवायांपैकी तब्बल १५ टक्के कारवाया या केवळ गेल्या चार दिवसांतील आहेत. यावरून प्रशासकीय यंत्रणा स्वतःचे कातडे वाचवण्यासाठी किती घाईघाईने सक्रिय झाली आहे, हे स्पष्ट होते.

पुण्याच्या घटनेनंतर नाशिकचे विभागीय आणि भरारी पथक तातडीने रस्त्यावर उतरली आहेत. घोटी, कळवण आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये (Taluka) अवैध दारूचे मोठे जाळे असल्याचे समोर आले असून, येथे सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. संशयितांची घरे, शेतातील शेड, नदीकाठचे भाग आणि हायवेवरील ढाबे, हॉटेल्स व खानावळींवर मध्यरात्री छापे टाकण्यात आले. मे महिन्यात विभागाने एकूण ३५८ गुन्हे दाखल करून ३८० जणांना अटक (Arrested) केली असून, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ वाहनेही जप्त केली आहेत.

खाकी वर्दीही मैदानात : भट्ट्या उद्ध्वस्त

केवळ उत्पादन शुल्कच नव्हे, तर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीसही या मोहिमेत मागे नाहीत. निलंबनाच्या भीतीने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. २९ आणि ३० मे या दोनच दिवसांत शहर पोलिसांनी १२, तर ग्रामीण पोलिसांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्कचे अंधेरनगरीचे धोरण उघड

पुण्यात २१ जणांचा जीव गेल्यावरच नाशिकमधील यंत्रणेला हे अवैध धंदे दिसू लागले का? हेच धाडस आणि कडकपणा आधी दाखवला असता, तर कदाचित राज्याला विषारी दारू नावाच्या कलंकाचा सामना करावा लागला नसता. सध्या तरी या कारवायांचे कौतुक कमी आणि बळी गेल्यानंतरचे शहाणपण जास्त, अशीच चर्चा नाशिककरांमध्ये आहे.

ताज्या बातम्या