Monday, October 19, 2026
Homeनगरचेअरमन तुरूंगात, ठेवीदारांचा पैसा कुठे?

चेअरमन तुरूंगात, ठेवीदारांचा पैसा कुठे?

अहिल्यानगर । सचिन दसपुते

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी श्री संत माऊली मल्टिस्टेट (तिसगाव अर्बन) चा चेअरमन सुनील शिरसाठ आणि श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटचा चेअरमन मयुर वैद्य यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. प्रमुख संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला गती मिळण्याची अपेक्षा असली, तरी हजारो गुंतवणूकदारांनी विश्‍वासाने गुंतवलेला पैसा परत कधी मिळणार, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न कायम आहे.

- Advertisement -

आकर्षक योजनांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण केल्याने अनेकांनी आयुष्यभराची बचत, मुदत ठेवी, अन्य स्वरूपातील गुंतवणूक, तर काहींनी सोने तारणाशी संबंधित व्यवहारांतून पैसे गुंतवले. मात्र, संस्थांमधील कथित आर्थिक गैरव्यवहार समोर आल्यानंतर हा विश्‍वास डळमळीत झाला. आता आरोपींच्या अटकेपलीकडे जाऊन ठेवीदारांच्या पैशांचा शोध घेणे आणि कायदेशीर प्रक्रियेतून त्यांना परतावा मिळवून देणे, हे आर्थिक गुन्हे शाखेपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटचा चेअरमन वैद्य याने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे संस्थेची सुरूवात केली. ‘शुध्द नीती जोडते नाती’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या संस्थेचा पुढे श्रीरामपूर, अहिल्यानगर, शेवगाव आणि पाथर्डी परिसरात विस्तार झाला. गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देणे, खोटी आश्‍वासने देणे आणि जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त करणे, तसेच ठेवींच्या रकमा परत न करता विश्‍वासघात केल्याचे आरोप वैद्य आणि संबंधित संचालकांवर आहेत.

या प्रकरणी 2025 मध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शेवगाव, पाथर्डी आणि अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर मयुर वैद्य पसार होता. त्याला अटक करण्याची मागणी ठेवीदारांकडून केली जात होती. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, अटकेमुळे तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला, तरी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती, ठेवींची एकूण रक्कम, पैशांचा झालेला विनियोग आणि उपलब्ध मालमत्ता यांचा सविस्तर तपशील समोर येणे अद्याप आवश्यक आहे.

श्री संत माऊली मल्टिस्टेट अर्थात तिसगाव अर्बन प्रकरणानेही शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यांतील नागरिकांची चिंता वाढवली आहे. या संस्थेचा चेअरमन सुनील शिरसाठ याच्यासह संचालक मंडळाविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिरसाठ यालाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

तिसगाव अर्बन या नावाने सुरू झालेल्या संस्थेचा पुढे श्री संत माऊली मल्टिस्टेट या नावाने विस्तार करण्यात आल्याचे सांगितले जाते. पाथर्डी येथील मुख्य शाखेसह तिसगाव, खरवंडी कासार आणि शिराळ चिंचोडी, नेवासा तालुक्यातील देडगाव, तेलकुडगाव, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव आणि ढोरजळगाव येथे शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. या शाखांमध्ये नागरिकांनी ठेवी आणि अन्य स्वरूपात गुंतवणूक केली. काही गुंतवणूकदारांचे सोने तारणाशी संबंधित व्यवहारांतही पैसे अडकल्याची माहिती समोर येत आहे. श्री संत माऊली मल्टिस्टेटने गोदावरी मल्टिस्टेटमध्ये ठेवलेले सुमारे दीड कोटीचे सोने पोलिसांनी सील केले आहे.

दरम्यान, या संस्थेच्या नोंदणीच्या स्वरूपाबाबतही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. संबंधित संस्था प्रत्यक्षात मल्टिस्टेट सहकारी संस्था नसून निधी लिमिटेड कंपनीच्या स्वरूपातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मल्टिस्टेट संस्थेप्रमाणे भासवून ठेवी स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता, संस्थेचे नेमके कायदेशीर स्वरूप आणि ठेवी स्वीकारण्याच्या पध्दतीबाबत अधिकृत नोंदींच्या आधारे तपासातून स्पष्टता येणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष भेटी, कार्यालयीन संपर्क आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देऊन परताव्याचे आमिष दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येते. संस्थेच्या नावातील बदल, नोंदणीचे स्वरूप, संचालकांची जबाबदारी आणि आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता या मुद्द्यांची चौकशी होणे त्यामुळे महत्त्वाचे ठरणार आहे.

अटकेनंतरही ठेवीदारांची चिंता कायम

दोन्ही संस्थांच्या प्रमुखांना अटक झाल्याने ठेवीदारांना तपासातून काही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, आरोपींना अटक होणे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. गुन्ह्याचा तपास, आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण, मालमत्तेचा शोध, निधीचे हस्तांतरण झाले असल्यास त्याचा मागोवा आणि न्यायालयीन प्रक्रिया या टप्प्यांनंतरच वसुलीचा मार्ग स्पष्ट होऊ शकतो. संस्थांकडे किती ठेवी जमा झाल्या, त्यापैकी किती रक्कम परत करण्यात आली, किती रक्कम थकीत आहे, निधी कुठे वळवण्यात आला आणि आरोपी किंवा संबंधित संस्थांच्या नावावर कोणती मालमत्ता आहे, याबाबत ठोस माहिती समोर येणे आवश्यक आहे.

गुंतवणूकदारांनी कागदपत्रांसह संपर्क साधावा

श्री संत माऊली मल्टिस्टेट (तिसगाव अर्बन) आणि श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट या दोन्ही संस्थांच्या प्रमुख संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, संबंधित गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या संस्थांमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणांत गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील पॅनलची जोरदार मुसंडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
कोल्हापूर । Kolhapur कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार सतेज...