Monday, October 19, 2026
Homeराजकीयगोकुळ निवडणुकीत सतेज पाटील पॅनलची जोरदार मुसंडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील पॅनलची जोरदार मुसंडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर । Kolhapur

कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मतमोजणीत आघाडी घेतल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ आणि अमर पाटील यांना पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

- Advertisement -

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, महायुतीचे ११ उमेदवार आघाडीवर असल्याने कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सत्तासंघर्षाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या निकालामुळे गोकुळ दूध संघावरील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढतीत सतेज पाटील यांच्या आघाडीची बाजू भक्कम होताना दिसत आहे.

महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे मतमोजणीतील बदलत्या कलामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अंतिम निकाल आणि विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा यानंतरच सत्तास्थापनेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची पिछाडी चर्चेचा विषय ठरली आहे. महायुतीतील महत्त्वाचे चेहरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगळे यांच्यासाठी हा कल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्यासोबतच अमर पाटील यांनाही मतमोजणीत पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि गोकुळचे माजी संचालक नवीद मुश्रीफ हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातून पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. कागल तालुक्यात महायुतीची राजकीय ताकद लक्षात घेता, त्यांच्या मतमोजणीतील स्थितीकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे मुश्रीफ कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेचीही चर्चा सुरू झाली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने आघाडी घेतल्याचे वृत्त समोर येताच कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी घोषणा देत आनंद व्यक्त केला, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. मतदारांचे आभार मानत कार्यकर्त्यांनी या कामगिरीचे स्वागत केले.

गोकुळ दूध संघाची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून कोल्हापूरच्या राजकीय वर्चस्वाशीही जोडली गेली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा अंतिम निकाल आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. आता अधिकृत निकालाकडे आणि गोकुळच्या सत्तास्थापनेच्या पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​कालिका देवी यात्रेत चोरांचा सुळसुळाट; १६ महिलांचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकची ग्रामदैवता कालिका देवी मंदिरात (Kalika Devi Temple) सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे....