अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरूग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरात ‘कुष्ठरूग्ण शोध अभियान’ ही मोहीम महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार असून महापालिका कर्मचार्यांच्या पथकांच्या माध्यमातून विविध घरातील नागरिकांची भेट घेऊन, नागरिकांची तपासणी करून जनजागृती करणार आहे.
घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत होईल, अशाप्रकारे पथके तयार केली जात आहेत. प्रत्येक पथकामध्ये महिला व पुरूष कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचार्यामार्फत आणि पुरूषांची तपासणी पुरूष कर्मचार्यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरिता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे आदी लक्षणे विचारून तपासणी होणार आहे. यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांकडे निदानासाठी संदर्भित करण्यात येणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहराची निवड केली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इत्यादी भागाचा समावेश केला आहे. या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहूविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरूग्ण शोधून बहूविध औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांनी प्रतिसाद देऊन स्वत:ची कुष्ठरोगाबाबत तपासणी करून उद्दिष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे,असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.