Tuesday, October 27, 2026
HomeनगरAMC : उपनगरांतील नव्या जलवाहिन्यांना महापालिकेची तात्पुरती स्थगिती

AMC : उपनगरांतील नव्या जलवाहिन्यांना महापालिकेची तात्पुरती स्थगिती

पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता || आयुक्त डांगे यांचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना बोल्हेगाव, नागापूर, कल्याण रोड, तपोवन रोड, केडगाव आणि बुरूडगाव रोड या उपनगरांमध्ये नव्या वसाहती आणि बहुमजली इमारतींची उभारणी सुरू आहे. मात्र, या नव्याने विकसित होणार्‍या भागांमध्ये विकासक किंवा जागामालकांना स्वखर्चाने नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेकडून तूर्तास परवानगी दिली जाणार नाही. पाणीपुरवठा व्यवस्थेवरील संभाव्य ताण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार, पाणीपुरवठा विभागाने सर्व प्रभाग कार्यालयांना यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. ज्या भागांमध्ये यापूर्वी कोणतीही पाणी वितरण व्यवस्था अस्तित्वात नाही, अशा ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यास परवानगी देऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ज्या भागांमध्ये आधीपासून पाणी वितरण व्यवस्था कार्यरत आहे, तेथे नियमानुसार नवीन जलवाहिन्या टाकण्यास परवानगी दिली जाणार आहे. शहराच्या उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत नागरीकरणाचा वेग वाढला आहे. मोकळ्या जागांवर नवीन गृहप्रकल्प, वसाहती आणि बहुमजली इमारती उभ्या राहत असल्याने या भागांतील लोकसंख्येतही वाढ होत आहे.

परिणामी, पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठा आणि विद्यमान वितरण व्यवस्थेची क्षमता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. नव्याने विकसित होणार्‍या भागांमध्ये स्वतंत्रपणे जलवाहिन्या टाकण्यास मोठ्या प्रमाणावर परवानगी दिल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन बिघडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील पाण्याची उपलब्धता, विद्यमान जलवाहिन्यांची क्षमता आणि वितरण व्यवस्थेचा विचार करून नवीन जलवाहिन्यांच्या परवानग्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणार्‍या वसाहतींमध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था उभारू इच्छिणार्‍या विकासक आणि जागामालकांना महापालिकेच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Rahata : ‘अर्णब’ चक्रीवादळही उत्तरेकडेच जाणार

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढुन 27 आक्टोबर 2026 रोजी त्याचे अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होऊन त्याचे पुढे...