Thursday, April 16, 2026
HomeनगरAMC : अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

AMC : अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

एक हरकत अंशतः मान्य || संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती उपलब्ध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राजकीय हस्तक्षेपासून इतर बरेच आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेला व राज्य शासनाच्या वेळापत्रकाची मुदत संपल्यानंतर सात दिवसांच्या विलंबाने अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी (20 ऑक्टोबर) जाहीर केली. प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग 9, 15 व 16 या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत. सदर अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे, व्याप्ती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिकेची 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात 2011 च्या जनगणनेच्या आधारावर 17 प्रभागाची रचना करण्यात आली होती. तर, प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक असे 68 जागा निश्चित केल्या होत्या. 2018 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर 2023 मध्ये संपला. त्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून मनपात प्रशासकराज सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या. राज्य निवडणूक आयोगाने 11 जून 2025 पासून प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले होते. 2011 च्या जनगणेच्या आधारावरच प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर हरकती घेण्यास मुदत देण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर 41 हरकती घेण्यात आल्या.

दरम्यान, 13 ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्याची मुदत होती. मात्र मुदत संपून देखील ती जाहीर न झाल्याने विविध शंका उपस्थित झाल्या. काहींनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढे काय झाले, हा अहवाल गेला का?, तक्रारदाराने पाठपुरावा केला का? सार्‍या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. दुसरीकडे प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग 9, 15 व 16 या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत. या प्रारूप आराखड्यातील बदलानुसार नगरविकास विभागाकडून अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

त्याला आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचना तयार करून प्रारूप आराखडा प्रसिध्द करण्यात आला. त्यावर आलेल्या 41 हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार 13 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यासाठी मुदत होती. नगरविकास विभागानेच हे वेळापत्रक जाहीर केले होते.

त्यांच्याचकडून अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगानेही या अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

शंकर महाराज मठ प्रभाग 15 मध्ये
प्रभाग 15 मधून दोन ब्लॉक कमी झाल्याने सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी प्रभाग क्रमांक 16 मधील शंकर महाराज मठ परिसर व अरूणोदय मंगल कार्यालय परिसर असे दोन ब्लॉक प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 ची लोकसंख्या 18 हजार 304 व प्रभाग क्रमांक 16 ची लोकसंख्या 21 हजार 061 अशी झाली आहे.

दोन ब्लॉक प्रभाग नऊमध्ये समाविष्ट
प्रभाग 15 मधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉक प्रभाग 9 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 22 हजार 091 झाली आहे.

उशीर कोणासाठी ?
अंतिम प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करायची होती. ती न झाल्याने विविध शंका उपस्थित झाल्या. प्रभागात मोडतोड करण्यासाठी शिवसेना आणि भाजप या महायुतीच्या घटकपक्षातच रस्सीखेच सुरू असून त्यामुळेच अंतिम मसुदा लटकल्याचे बोलले जात होते. सरकारवर गंभीर आरोप केले गेले. काहींनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने नगरविकास विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तब्बल सात दिवस उशीराने अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द झाली. त्यात प्रारूपमध्ये किरकोळबदल झाल्याचे दिसते. मग एवढे दिवस नगरविकास विभागाने कोणासाठी आणि कशासाठी ताणले, याचाही खुलासा होण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : धर्मांतर, अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा – सकल हिंदू...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) रणरागिणी जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या...