नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) रणरागिणी जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने महिला, तरुणी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संबंधित संशयित आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे व हर्षा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जॉगिंग ट्रॅक येथून रॅलीला सुरुवात झाली. इंदिरानगरमार्गे पुढे सरकत अशोका मार्गावरील टीसीएस कंपनीपासून मोटारसायकल रॅलीत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर ही रॅली अशोका मार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग, मुंबईनाका, त्र्यंबकनाका, शालिमार चौक, एम.जी. रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू
रॅलीदरम्यान वंदे मातरम्, भारत माता की जय, नारीशक्ती आगे बढो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. कडक उन्हातही महिलांचा (Women) उत्स्फूर्त व आक्रमक सहभाग दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निवेदनाची प्रत अर्पण करून शिवरायांना साकडे घालण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देत याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या रॅलीत कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात (Court) खटला चालवावा व दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी भूमिका आ. देवयानी फरांदे यांनी मांडली. शहरातील काही आयटी कंपन्यांची चौकशी करून सखोल तपास करावा, अशीही मागणी करण्यात आली. याचवेळी काही वक्त्यांनी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन शहरातील वकिलांना केले. मात्र या भूमिकेमुळे कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे २०० महिला वकील पुढे आल्याची माहिती देण्यात आली.




