Monday, August 17, 2026
Homeनगरमहापालिका निवडणुक : 63 जागेसाठी 283 रिंगणात, चिन्हांचे आज वाटप

महापालिका निवडणुक : 63 जागेसाठी 283 रिंगणात, चिन्हांचे आज वाटप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवार) राजकीय वातावरण चांगलेच तापले. 17 प्रभागांतील 68 जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी तब्बल 194 उमेदवारांनी माघार घेतली, तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या एकूण पाच उमेदवारांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 283 उमेदवार अंतिम लढतीसाठी शिल्लक राहिले आहेत. गुरूवारी राष्ट्रवादीचे दोघे बिनविरोध झाल्यानंतर शुक्रवारी भाजपाचे तिघे बिनविरोध झाले आहे. यामुळे आता 63 जागेसाठी निवडणुक होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. आज (शनिवार) उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, त्यानंतर प्रचाराला अधिकृत सुरूवात होईल.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी युती, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याशिवाय आम आदमी पार्टी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एकलव्य बहुजन विकास पार्टी, जगदंबा विकास आघाडी यांच्यासह मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण 788 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज बाद ठरविण्यात आले होते. काही उमेदवारांनी एकाच प्रभागात दोन ते तीन अर्ज दाखल केल्याने नियमांनुसार पहिला अर्ज ग्राह्य धरून उर्वरित अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे अर्ज छाननीनंतर 477 इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले होते. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी (गुरूवारी) एकुण 28 उमेदवारांनी माघार घेतली होती. दुसर्‍या व शेवटच्या दिवशी दिवसभर विविध प्रभागांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. इच्छुक उमेदवारांची मनधरणी, वरिष्ठ नेत्यांचे फोन, मध्यस्थी, देवदर्शनासाठी गेलेले उमेदवार यामुळे वातावरण चांगलेच तापले. अखेर दिवसभरात सुमारे 194 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली आणि 283 उमेदवार अंतिम लढतीसाठी मैदानात उतरले.

राष्ट्रवादीचे कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे हे पहिल्या दिवशी बिनविरोध झाले होते. शुक्रवारी भाजपाचे तिघे बिनविरोध झाले आहे. यामध्ये प्रभाग 6 मधून करण उदय कराळे, सोनाबाई तायगा शिंदे आणि प्रभाग 7 मधून पुष्पा अनिल बोरूडे यांचा समावेश आहे. युतीच्या पाच जागा बिनविरोध निवडूण आल्याने त्यांनी बाजी मारली आहे.

काही प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एबी फॉर्मच्या अपेक्षेने अर्ज दाखल केले होते. मात्र, पक्षाकडून इतरांना संधी मिळाल्यानंतर नाराजी असूनही निष्ठावंतांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अर्ज माघारी घेतले. प्रभाग क्रमांक 6 मधून करण कराळे व सोनाबाई शिंदे हे बिनविरोध ठरताच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. आज उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचार अधिकृतपणे सुरू होणार आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेली ही लढत येत्या काही दिवसांत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

नाट्यमय माघारींची मालिका

प्रभाग 7 (ब) मधून शिवसेनेच्या उमेदवार श्रध्दा वाकळे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या पुष्पा बोरूडे यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली. तसेच प्रभाग 6 (ब) मधून शिवसेनेच्या अवंतिका सिरसूल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या सविता गायकवाड यांनी माघार घेतल्याने भाजपच्या सोनाबाई शिंदे या बिनविरोध ठरल्या.

सावेडीत मध्यस्थीचा खेळ

प्रभाग क्रमांक 6 (ब) मधील दोन भाजप उमेदवार बिनविरोध होण्यामागे भाजपच्या एका माजी नगरसेवकाची व निष्ठावंत पदाधिकार्‍याची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सावेडी उपनगरात माजी आमदारांच्या घरी बसलेल्या एका उमेदवाराला शेवटच्या 20 मिनिटांत गाठून अर्ज माघारी घेण्यात यश आल्याचे बोलले जाते.

शिवसेनेचा दावा फेटाळला

प्रभाग 6 (ब) मधून शिवसेनेच्या उमेदवार अवंती शिरसूल यांच्या वतीने सूचकाने अर्ज माघारी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. उमेदवार स्वतः उपस्थित नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली. मात्र, सहीची पडताळणी करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शिवसेनेचा दावा फेटाळला व भाजपच्या सोनाबाई तायगा शिंदे बिनविरोध विजयी झाल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...