Thursday, November 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAhilyanagar News : भीमराज दराडे यांची मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Ahilyanagar News : भीमराज दराडे यांची मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

अहिल्यानगर | प्रतिनिधी | Ahilyanagar

शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे (Bhimraj Darade) यांची मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दराडे यांनी श्री साईबाबा संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्या कामाची पावती म्हणूनच त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

- Advertisement -

दराडे यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Saibaba Sansthan) उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी संस्थानच्या प्रशासकीय कामकाजात आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली. आता त्यांची मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. दराडे हे मूळचे नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथील रहिवासी आहेत. त्यांचे माध्यमिक शिक्षण सोनई, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नगरच्या रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालयात झाले. पुणे येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी पदविका, तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून तहसीलदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी यवतमाळ येथून प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

नगर तालुक्याचे (Nagar Taluka) तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन केले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला, चांदवड तसेच धुळे येथे उपविभागीय अधिकारी म्हणून, तर जळगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. विविध पदांवर काम करताना त्यांनी महसूल प्रशासनातील अनुभव आणि कार्यतत्परता सिद्ध केली. स्वच्छ प्रतिमा, प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून दराडे यांची ओळख आहे. त्यांच्या मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीबद्दल नगर जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या