Thursday, November 12, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात चार लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची...

Nashik News : जिल्ह्यात चार लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत

आर्थिक संकटात शासनाचा आधार; शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

नाशिक | Nashik

जिल्ह्यात पुरेश्या पावसाअभावी शेतीपिकांचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणींच्या काळात दिवाळीपूर्वी (Diwali) शासनाकडून मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. या मदतीमुळे कुटुंबासमवेत (Family) दिवाळीचा सण आनंदात साजरा करता आला असून, शासनाने योग्य वेळी मदतीचा हात दिल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे चार लाख सत्तेचाळीस हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन बाधित क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे चार लाख सत्तेचाळीस हजार ४३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आले आहेत.

या मदतीबाबत सिन्नर तालुक्यातील दापूर येथील योगेश आव्हाड, इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील शांताराम गोगाजी पालवे आणि हिरामण निंबाजी पालवे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) कोकणगाव येथील शांताराम मोरे व हेमंत चंद्रभान मोरे, मालेगाव तालुक्यातील सायने येथील शांतीलाल साहेबराव शेवाळे व भूषण देवीदास सावंत आणि दाभाडी येथील सुभाष तुकाराम नहिरे यांनीही शासनाच्या मदतीबद्दल आभार मानले.

मालेगाव तालुक्यातील सायने येथील शांतीलाल साहेबराव शेवाळे यांनी आपण मक्याची लागवड केली होती, असे सांगितले. शेतीतील अडचणींच्या काळात शासनाकडून मिळालेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिलासादायक ठरली आहे. दिवाळीच्या तोंडावर खात्यात पैसे जमा झाल्याने सण आनंदात साजरा करता आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील शांताराम गोगाजी पालवे व हिरामण निंबाजी पालवे यांनी दिपावली निमित्त शासनाने पाच हजार रूपयांची अग्रीम रक्कम खात्यावर जमा झाल्याने शासनाचे आभार मानले आहे.

राज्य शासनाने (Government) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी केलेली पाच हजार रुपयांची मदत खूप मोलाची आहे. यामुळे आपली दिवाळी गोड झाली. मी राज्य शासनाचे आभार मानतो, अशी भावना सिन्नर तालुक्यातील दापूर येथील शेतकरी योगेश आव्हाड यांनी व्यक्त केली. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी हेमंत चंद्रभान मोरे यांनी दिवाळी सणात महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या ५ हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्याबद्दल समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले.

दुष्काळ परिस्थितीमुळे शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी दिवाळीपूर्वी शासनाकडून खात्यात जमा झालेल्या पाच हजार अग्रीम मदतीमुळे दिवाळी गोड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील सुभाष तुकाराम नहिरे यांनी मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक येथील भूषण देविदास सावंत यांनीही मका पिकाच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळालेली ५ हजार रुपयांची मदत दिलासादायक ठरली. या मदतीबद्दल मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासनाने आर्थिक मदतीचा आधार दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. वेळेत अग्रीम मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या