Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : आज ऑरेंज अलर्ट; जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले

Ahilyanagar : आज ऑरेंज अलर्ट; जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात 30 व 31 मार्चला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 1 व 2 एप्रिल या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वार्‍याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मार्च महिन्यांच्या शेवटच्या टप्प्यात आणि एप्रिलच्या तोंडावर वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. मागील पंधरवड्यात जिल्ह्यात सलग तीन दिवस वादळी पावसासह गारपिट झालेली आहे. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आता पुन्हा वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी. बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे कांदा, मका, गहू, डाळिंब, द्राक्षे, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यात 103 गावांमधील 12 हजार 999 शेतकर्‍यांच्या 8 हजार 91 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दणका बसला. यात उन्हाळी हंगामातील द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाला होता. आता पुन्हा दोन दिवस ऑरेज आणि दोन दिवस पावसाच्या येलो अलर्टमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नुकसानीच्या अंतिम अहवालाची प्रतिक्षा
जिल्ह्यात मागील दहा ते 12 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात कृषी विभागाला यश आलेले नाही. येत्या दोन दिवसात यापूर्वी झालेल्या वादळातील नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...