Friday, July 24, 2026
Homeनगरजिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम; तीन दिवसांत १७२ आरोपींवर कारवाई

जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम; तीन दिवसांत १७२ आरोपींवर कारवाई

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्य शासनाच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधात व्यापक धडक मोहीम राबवत कारवाई केली आहे. जिल्हाभरात सलग तीन दिवस चालविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्या एकूण १७२ आरोपींविरूध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच लाख ९७ हजार ८९० रूपये किंमतीचा एकुण २२ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांनी विशेष पथके तयार करून संशयितांवर लक्ष ठेवत जिल्हाभर एकाचवेळी कारवाया केल्या. या मोहिमेत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १६६ व्यक्तींविरूध्द १५७ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गांजा बाळगून विक्री करणाऱ्या सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २२ किलो ५३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पाथर्डी, तोफखाना, बेलवंडी आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या राबविली.

अंमली पदार्थांविरोधातील कारवाई यापुढेही अविरत सुरू राहणार असून नागरिकांनी कोणतीही माहिती स्थानिक गुन्हे शाखा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल.

-संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, एलसीबी

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....