अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्रशासकीय बदल्या झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले असतानाही अनेक अधिकारी व अंमलदार अद्याप मूळ नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली का, असा प्रश्न उपस्थित होत असून काही प्रभारी अधिकाऱ्यांनी या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
अधीक्षक सुदर्शन यांनी ४ जून, ११ जून, १५ जून आणि २२ जून २०२६ रोजी प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानंतरही संबंधित अधिकारी-अंमलदारांना कार्यमुक्त करण्यात विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी स्वतंत्र आदेश काढून सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकाऱ्यांना २९ जून रोजीच बदली झालेल्या अधिकारी व अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशात कार्यवाहीचा अहवाल त्याच दिवशी उलट टपाली सादर करण्यास सांगण्यात आले होते. तसेच, बदली झालेल्या अधिकारी-अंमलदारांना कार्यमुक्त न करणाऱ्या संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांविरूध्द शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
नवीन याचबरोबर, बदली झालेल्या अधिकारी-अंमलदारांना ठिकाणी हजर होईपर्यंत जुलै २०२६ चे वेतन काढले जाणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या आदेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, आदेशानंतरही अनेक अधिकारी व अंमलदार मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी करण्यात संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत असल्याने पोलीस प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे. आदेशाचे पालन झाले नसल्यास संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रत्यक्षात शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




