गोदड महाराज यांच्या संवत्सरीचे भाकीत
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी राहिल असे संकेत काही हवामान विभागाकडून मिळत असतानाच, यंदा महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिल, असे भाकीत गोदड महाराज संवत्सरी, चांदेकसारे बाल भैरवनाथ आणि इंद्रराज गुढीच्या माध्यमातून वर्तविण्यात आले आहे. पण पिके चांगली राहतील असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे.
कर्जत प्रतिनिधीने कळविले की, इराण -इस्त्राईल, अमेरिका यांच्यामधील सुरू असलेल्या युद्धाचा गंभीर परिणाम आपल्या देशावर होणार असून पुढील काळामध्ये रोगराईमध्ये वाढ होईल. अतिवृष्टी व पुराचा धोका उद्योग व्यवसायामध्ये तेजी-मंदीचे वातावरण राहिल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण होईल, राजा व प्रजा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद विवाद होतील. विरोधी भावना वाढेल, भूकंप आणि आग लागण्याच्या मोठ्या घटना घडतील. असे भाकित कर्जत येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये वर्तवण्यात आले आहे.
दरम्यान, यावर्षी मान्सून वेळेवर येईल आणि महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल, मात्र ऑगस्ट महिन्यांमध्ये समाधानकारक पाऊस असेल काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. परतीचा पाऊस देखील मोठ्या प्रमाणामध्ये होणारा असून त्यावेळी पुराचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल. काही भागांमध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. नक्षत्रांनिहाय देखील अनेक नक्षत्रांमध्ये चांगला पाऊस सांगितला आहे. मात्र, तो सर्व समावेशक पडणार नसून काही ठिकाणी खंडित पाऊस पडणार आहे.
गोदड महाराज यांनी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी विविध ग्रंथ औषधे यासह प्रचंड मोठे लिखाण केले आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी पाऊस, पिके, पाणी, संकटे, राजकीय व सामाजिक घटना याची एक संवत्सरी 60 वर्षांची लिहिलेली आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये यावर्षीचे भाकीत वाचण्यात येते. हे भाकीत खरे होते अशी भाविकांची भावना असून वर्षभर आजच्या दिवसाची शेतकरी तसेच पंचक्रोशीतील नागरिक वाट पाहत असतात. यावर्षी काय होणार याची उत्सुकता सर्वांना असते. यामुळे सकाळी पासूनच मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. मंदिराचे प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील यांचे वाजत गाजत मंदिराकडे आगमन झाल्यानंतर मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी या भाकिताचे वाचन केले. या संवत्सरीच्या भाकितावर शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या कामाची नियोजन करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
यावर्षी जे भाकीत वर्तवण्यात आले, यामध्ये पुढे सांगितले आहे, यावर्षीच्या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. याचा स्वामी राहू गुरु आहे. खरीप हंगामासाठी चांगला पाऊस सांगितला आहे. मात्र दुसरीकडे धान्य संचय काही ठिकाणी करावा लागेल असेही यामध्ये सांगण्यात आले असून आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन या चार महिन्यांमध्ये परिस्थिती मात्र चांगली होईल. पाऊसही चांगला पडेल. यावर्षी देखील हे भाकीत ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला उपस्थित होत्या. मंदिरामध्ये जागा कमी पडल्यामुळे अनेक भाविक मंदिराच्या बाहेर हे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित होते.
आजपर्यंत भाविक खरेच ठरले
संत सद्गुरु गोदड महाराज यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पद्धतीचे लिखाण केले आहे. यामध्ये शेतकर्यांसाठी अतिशय महत्त्वाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी याचं वाचन करण्यात येते. शेतकर्यांमध्ये याविषयी मोठी उत्सुकता असते. या भविष्यानुसारच शेतीच्या कामाची नियोजन करण्यात येते आणि आजपर्यंत हे भाकीत कधीही खोटे ठरले नाही असा आमचा ठाम विश्वास असल्याचे भाविक सुरेश ख्रिस्ती यांनी सांगितले.
चांदेकसारे येथीलबाल भैरवनाथाचा कौल
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पाऊस जरी मध्यम पडला तरी अन्नधान्य मुबलक पिकले जाईल तसेच चालू वर्षात अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, असा कौल दिला आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माता जोगेश्वरी व बाल भैरवनाथ मंदिरात बाराशे वर्षापासून जुनी असलेली पर्जन्य देवता अनुकूलता, गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या सुरुवातीला चालू आर्थिक वर्षात पावसाचे प्रमाण, आर्थिक उलाढाल व रोगराई अशा सर्व प्रकारचे भाकित वर्तवण्याची परंपरा आज देखील चांदेकसारे येथील ग्रामस्थांनी टिकून ठेवली आहे.
स्मशानभूमीतीलइंद्रराज गुढीचे भाकीत
पीक पाणी समाधानकारक राहणार असून पाऊस मध्यम स्वरूपात पडणार आहे, असे भाकीत करण्यात आले. राज्यात फक्त वैजापूर व पैठण येथेच अशी स्मशानभूमीत गुढी उभारुन पाडव्याच्या दिनी भाकीत केले जाते. भाकीत येथील स्मशानभूमीत पाडव्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवार दर्श अमावस्या दिनी स्मशानभूमीत ज्या ठिकाणी पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. त्या ठिकाणी इंद्रराज गुढी उभारल्या नंतर पाडव्याच्या दिनी पुरोहित सुभाष हतवळणे यांनी केले.
पिंपरी निर्मळ येथील संवत्सर फल
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal
चालू वर्षी पावसाचे प्रमाण मध्यम राहणार आहे. मात्र पिके चांगली येण्याचे भाकीत संवत्सर फल पिंपरी निर्मळ येथील ग्राम पुरोहित मनिष गुरू तिवारी काशिकर यांनी केले आहे. सुरु होणारे नवीन वर्ष पराभव संवत्सर हिंदु कालचक्रातील 40 वे वर्ष आहे. याचा शाब्दिक अर्थ पराभव असला तरी आध्यात्मिक दृष्टीकोनातून वाईट सवयींचा व अहकारांचा त्याग करून नवीन सुरुवात करणे असा घेतला जातो. ग्रहांच्या स्थितीनुसार यावर्षी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.





