Sunday, April 5, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरात श्रीराम नवमीची भव्य मिरवणूक आज

Ahilyanagar : अहिल्यानगरात श्रीराम नवमीची भव्य मिरवणूक आज

चार मंडळांचा सहभाग || 218 व्यक्तींना हद्दपारीचे आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यासह अहिल्यानगर शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही आज (गुरूवार) सायंकाळी शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, या मिरवणुकीत चार मंडळे सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मिरवणुकीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार असून, हिंदुत्ववादी संघटना आणि रामभक्तांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी निघणार्‍या या मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज, वास्तव कंपनी तसेच श्रीराम सेना बोल्हेगाव ही चार मंडळे सहभागी होणार आहेत. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. मार्गावरील उंच इमारतींवरून पोलिसांची करडी नजर राहणार असून, दुर्बिणींच्या साहाय्याने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून, वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीवर लक्ष राहणार आहे. हुल्लडबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 218 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भारतीय न्याय दंड संहिता सुरक्षा कलम 163 (2) अंतर्गत मिरवणुकीच्या काळात हद्दपारीचे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामध्ये तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील 99, कोतवाली हद्दीतील 70 आणि भिंगार कॅम्प हद्दीतील 49 जणांचा समावेश आहे.

मिरवणूक मार्गावरून वाद कायम
सन 2015 मध्ये पहिली मिरवणूक आशा टॉकीज मार्गे काढण्यात आली होती. त्यावेळी वाद होऊन दंगल उसळली होती. त्यानंतर 2016 पासून मिरवणूक बॉम्बे बेकरी-चांद सुलताना स्कूल मार्गे काढण्यात येत आहे. मात्र, संघटनांनी पुन्हा जुन्या आशा टॉकीज मार्गेच मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन नवीन मार्गावर ठाम असून, त्या मार्गाची पाहणी करून आवश्यक बंदोबस्ताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सुमारे 500 पोलिसांचा फौजफाटा
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये दोन पोलीस उपअधीक्षक, 9 पोलीस निरीक्षक, 14 सहायक व उपनिरीक्षक, 300 पोलीस अंमलदार, 100 होमगार्ड, क्यूआरटीचे एक पथक तसेच एसआरपीएफचे एक पथक असा सुमारे 500 जणांचा फौजफाटा तैनात असणार आहे. याशिवाय दोन ड्रोन कॅमेरे आणि मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांव्दारे सतत देखरेख ठेवली जाणार आहे.

ताज्या बातम्या

राजकारण : आता मात्र हद्द झाली!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक खरातपाठोपाठ पत्रकार रवींद्र एरंडे याच्या लैंगिक शोषणाच्या भानगडी बाहेर आल्याने नाशिकच्या बदनामीत भर पडली आहे. या...