अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची सहायक पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे यांची अवघ्या वर्षभरातच बदली झाल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
घार्गे यांनी 23 मे 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या करताना राजकीय दबाव झुगारून निर्णय घेतले होते. स्थानिक गुन्हे शाखेतील नियुक्त्यांमध्येही त्यांनी स्वायत्तता राखली होती. मात्र, त्याच गुन्हे शाखेतील एका कर्मचार्याने जप्त मुद्देमालातील ड्रग्सची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आणि ते राज्य अधिवेशनातही गाजले. याशिवाय, जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, विशेषतः खून, दरोडे आणि खूनाच्या प्रयत्नांच्या घटनांबरोबरच संगमनेर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यातील आरोपी अद्याप अटकेत नसल्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आर्थिक घोटाळ्यांच्या प्रकरणांत तपासात होत असलेल्या कथित हलगर्जीपणावरूनही प्रशासनावर टीका झाली. या सर्व घडामोडींमुळेच घार्गे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले मुम्मका सुदर्शन हे महाराष्ट्र केडरमधील तरूण, कर्तबगार आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते मूळचे आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून तसेच नागपूर येथे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नागपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी अंमली पदार्थ आणि हुक्का पार्लरविरोधात कठोर कारवाई करत ‘ड्रग्स फ्री नागपूर सिटी’ ही मोहीम राबवली होती. त्यांच्या कडक शिस्तप्रिय कार्यपध्दतीमुळे ते धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणणे, पोलीस खात्यात शिस्त प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, ही मोठी जबाबदारी आता सुदर्शन यांच्यावर असणार आहे.





