Friday, May 8, 2026
HomeनगरAhilyanagar : नगरमध्ये लाकडाची मागणी वाढली अन् आवक घटली

Ahilyanagar : नगरमध्ये लाकडाची मागणी वाढली अन् आवक घटली

गॅस टंचाईचा परिणाम || दररोज 50 टनापर्यंत लाकडाची विक्री, भविष्यात लाकूड टंचाईची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरासह जिल्ह्यात गॅसटंचाई निर्माण झाली असून, घरगुती गॅस सिलिंडरची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे इंधनासाठी सरपणसुद्धा (जळावू लाकूड) मिळणे दुरापास्त झाल्यामुळे झाडांची तोड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या 10 ते 15 दिवसापासून नगर शहरात स्थानिकांकडून लाकडाची मागणी वाढली असून दुसरीकडे लाकडाची आवक कमी झाल्याने सर्वांना लाकडे पुरवणे शक्य नसल्याचे नगरच्या सॉ मिल चालकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर शहर आणि परिसरात जवळपास 15 ते 20 सॉ मिल असून त्या ठिकाणी यापूर्वी लाकडाची मागणी सिमित होती. मात्र, युध्दामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली आणि सर्वसामान्यांसह हॉटेल चालकांनी आपला मोर्चा लाकडाकडे वळवला. परिणामी नगर शहरात आता लाकडाची टंचाई निर्माण होण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात तयार होवून विक्रीसाठी येणार्‍या जळावून लाकडाच्या आवकमध्ये मोठी घट आली आहे.

ग्रामीण भागातील हॉटेल चालक हे स्थानिक ठिकाणी लाकडे विकत घेत असल्याने नगरमधील सॉ मिलमध्ये आवश्यक तेवढा लाकडाचा पुरवठा होत नसल्याने मागणीनूसार पुरवठा होत नसल्याचे नगरच्या सॉ मिल चालकांडून सांगण्यात आले. परिस्थिती अशीच राहिल्यास नगरमध्ये लाकडाची टंचाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात हॉटेल चालकांसह नागरिकांनी चुली पेटविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. लहान हॉटेल, रस्त्यावरील चहा-नाश्ता विक्रेत्यांकडून चूल व शेगडीचा पर्याय निवडण्यात आला आहे.

नगरच्या लाकडला मुंबईत मागणी
नगरच्या सॉ मिलमध्ये तयार होणार्‍या जळावू लाकडाला मुंबई, नवी मुंबई, वाशी, कल्याण, ठाणे या ठिकाणी कापड निर्मिती करणार्‍या कंपन्या, औषध निर्मिती करणार्‍या कंपन्या आणि बेकरी उत्पादन करणार्‍यांकडून अधिक मागणी आहे. हे ग्राहक पूर्वीपासून असून शहरात गॅस टंचाई निर्माण झाल्याने स्थानिक हॉटेल चालकांकडून आता लाकडाला मागणी करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी परवाना अनिवार्य
लाकूड असो किंवा मग कोळसा असो त्याची वाहतूक करण्यासाठी वन विभागाचा वाहतूक परवाना आवश्यक असतो. लाकूड, कोळसा वाहतूक करण्यापूर्वी जवळच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून ट्रान्झिट पास घेणे अनिवार्य असते.

अवैध वाहतूक करणार्‍यांना दंड
लाकडी सरपण, कोळसा मागणी वाढल्याने वृक्षाची अवैध तोड केल्यास वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमांतर्गत संबंधिताविरुद्ध शहरी भागात महापालिका व ग्रामीण भागात वनविभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. यासाठी 50 हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

गॅसचा प्रश्न अद्यापही ज्वलंत
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडर व व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा अद्यापही विस्कळीत आहे. व्यावसायिक सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तसेच घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणीची कालमर्यादा व दरसुद्धा वाढविण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात उद्योगमंत्री सामंतांचा संताप; शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योगमंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्कप्रमुख...