Saturday, July 27, 2024
Homeनगरकुणबी जातीचे पुरावे शोधण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

कुणबी जातीचे पुरावे शोधण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुरूवातीला मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. 3 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी 4 नोव्हेंंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सलीमठ यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कक्ष स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे सदस्य सचिव असणार आहेत. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगरपालिका प्रशासन) हे असणार आहेत. तालुकास्तरावरही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नायब तहसीलदार (निवासी) हे सदस्य सचिव असणार आहेत. सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) हे असणार आहेत.

या स्थापन समिती व कक्षाने महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन वही व सातबारा उतारे. 1951 नमुना नंबर 1, नमुना नंबर 2, हक्क नोंद, जन्ममृत्यु रजिस्टर गाव नमुना क्रमांक 14. तसेच शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही/जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अभिलेखे अनुन्याप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, अस्थापना अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेखे रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभाग गाववारी, गोपनीय रजिस्टर सी 1, सी 2, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफआयआर रजिस्टर. याशिवाय सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक, करार खत, साठेखत, इसार पावती भाडे चिठ्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्र, इच्छापत्रक, तडजोड पत्र ई- दस्त, भूमि अभिलेख विभाग पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक, प्रति, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वफ्फ अधिकारी यांचे कडील मुंतखब, शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवा तपशील सन 1967 पूर्वीचे कर्मचार्‍यांचा सेवा तपशील, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे वरील अभिलेख तसेच तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील 1967 पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करायची आहे.

त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्यांचे स्कॅनिंग करून जतन करावे तसेच तपासलेले कागदपत्र व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरूपात जिल्हा समितीने प्राप्त करून घेवून जिल्हा समिती विभागीय समितीस तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर अद्ययावत कराव्यात. तसेच सदस्यांनी तालुका कक्षास भेट देवून चाललेल्या कामाची प्रगती तपासावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नागरिकांनी 1967 पूर्वीचे पुरावे द्यावेत

प्रशासकीय स्तरावरील अभिलेख शोधण्याबाबत नियोजन करण्यात आलेले असून नागरिकांना त्यांचे कडील 1967 पूर्वीचे शासकीय पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करता येतील. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील 1967 पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या