नाशिक | प्रतिनिधी | Nashik
म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणाचा (Mhada House Scam) तपास आता महापालिकेतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असून, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील (Kalpesh Patil) यांच्या अटकेनंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून (Police) अटकेबाबतचा अधिकृत अहवाल महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर आता त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निलंबनाचा प्रस्ताव सोमवारी (दि. ११) नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
शहरातील म्हाडा घरकुल घोटाळ्याच्या तपासात बांधकाम व्यावसायिकांनी भूमी अभिलेख विभागाचे बनावट शिक्के आणि सह्या वापरून खोटे मोजणी नकाशे (Map) तसेच आकारफोड पत्रके तयार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) १९७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे. यापूर्वी या प्रकरणात सोनू मनवानी यांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी (Police) कल्पेश पाटील यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाटील हे २०२२ पासून महापालिकेच्या नगररचना विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेमधील अधिकारी ४८ तासांहून अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्यास त्यांच्याविरोधात विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने पुढील हालचाली सुरू केल्या आहेत.
पोलिस आयुक्तालयाकडून (Commissionerate of Police) अटकेसंदर्भातील पत्र शुक्रवारी (दि. ८) महापालिकेला प्राप्त झाले. मात्र, आयुक्त मनीषा खत्री मुंबई दौऱ्यावर असल्याने प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता सोमवारी आयुक्तांच्या मंजुरीनंतर नगरविकास विभागाकडे (Urban Development Department) प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.




